चाळीसगाव-नगरपरिषदेच्यावतीने शहरात दररोज कचरा संकलन केले जाते. हा सर्व गोळा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच्या मालकीच्या जागेत उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पात केली जाते. जमा झालेल्या कचऱ्यातील भंगार मालाचे स्वतंत्र संकलन करून त्याची विक्री केली जाते असा अभिनव प्रयोग करून पालिकेने आपल्या उत्पन्नात भर घातली आहे. या लहानशा उपक्रमातून दहा हजार रुपयांचे उत्पन्न पालिकेने मिळवले आहे. या प्रकल्पामुळे आरोग्य विभागाचे कौतुक होत आहे.
पालिकेच्या मालकीचा उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प आहे येथे दररोज टनाने कचरा गोळा होता यात प्लास्टिक, काच, कचरा पुठ्ठा, कागद, रद्दी, चप्पल, बूट या सारख्या भंगार माला चे संकलन करून पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराला दिला जातो.
जनजागृतीतून कचरा वर्गीकरण-मुख्याधिकारी
चाळीसगाव नगरपरिषदेने गेल्या दोन-तीन महिन्यापासून प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेगळा देण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले आहे. त्यामुळे नागरिकांकडून देखील वर्गीकृत कचरा गोळा होतो आहे आणि हा सुका कचऱ्यातील भंगार गोळा करून पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराला दिला जातो आहे यातून अल्प का होईना उत्पन्न मिळते आहे . त्यातून पालिकेचा प्रत्येक विभागातून सुरू असलेल्या सूक्ष्म कारभाराचा प्रयत्न दिसून येत असल्याची भावना मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी जनशक्तिशी बोलताना दिली आहे.