चाळीसगाव । पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेसाठी नाममात्र 28 रुपये 75 पैसे फी असतांना चाळीसगाव नगरपालिकेकडून 300 रुपये प्रमाणे बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून सदर फी घेणे बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा सोमवारी 16 मे 2017 रोजी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे.
चाळीसगाव नगरपालिकेच्या बांधकाम सभापती विजया प्रकाश पवार व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना 16 मे 2017 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नाममात्र फी 28 रुपये 75 पैसे नियमानुसार आहेत.मात्र असे असतांना चाळीसगाव नगरपालिकेत नियमबाह्य 300 रुपये फॉर्म फी वसुल केली जात आहे. ही वसुली बंद करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका तथा बांधकाम सभापती विजया प्रकाश पवार व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे. या निवेदनावर नकुल पाटील, भाऊसाहेब सोमवंशी आदींच्या सह्या आहेत.