चाळीसगाव पालिकेची सभा गाजली

0

सदस्य संख्येवरून तू तू मैं मैं : मावळत्या गटनेत्यांचे मौन

चाळीसगाव। महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत व औद्यागिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 63 तसेच महाराष्ट्र नगरपालिका विषय समिती निवडणूक नियम 1966 मधील तरतुदीनुसार स्थायी समिती व विषय समिती सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून तहसीलदार तथा पीठासन अधिकारी कैलास देवरे यांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी समिती सदस्यांच्या संख्येवरून दीड तास तू-तू मैं-मैं झाली. यावेळी सत्ताधारी पक्षाचे मावळते गटनेते राजेंद्र चौधरी यांचे मौन चर्चेचा विषय ठरली आहे. अखेर दोन्ही गटाचे समसमान 5 सदस्य व शिवसेनेचा 1 मिळून 11सदस्याची अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण यांची उपस्थिती तर सभागृहात सर्व सदस्य उपस्थित होते.

सर्वांनी आपापली मांडली मते
विशेष सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासन अधिकारी कैलास देवरे यांनी सदस्य संख्या ठरविण्यासाठी सदस्याची व गटनेत्यांची मते जाणून घेतली. यावर सुमारे दीड तास तू तू मैं मैं चालली. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे गटनेते व नगरसेवक यांनी आपली मते मांडली राजीव देशमुख यांनी आजपर्यंतची अकरा सदस्याची परंपरा असल्याचे सूचित केले. यावर सत्ताधारी पक्षाचे चिराग शेख यांनी 8 किंवा 10 सदस्य असावे अशी सूचना मांडली. यावर सर्व सदस्यांमध्ये चर्चेचा खल सुरू झाला. यावेळी नूतन गटनेते संजय पाटील व घृष्णेश्वर पाटील यांनीही अकरा सदस्यांचे नामनिर्देशन कायम करावे अशी सूचना मांडली यानंतर ही चर्चा थांबली.

आपण ठरवून आले आहात का?- देशमुख
पीठासन अधिकारी कैलास देवरे यांनी सदस्य संख्या ठरविण्यावर मते जाणून घेतली व त्यावर निर्णय दिला. यावर राजीव देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत आपण काही ठरवुन आले आहात काय असे सूचक वक्तव्य केले तर रामचंद्र जाधव यांनी या सभेला काही वेळेची मर्यादा आहे का? आपणास कोठे कामानिमित्त जावयाचे आहे असा सवाल तहसीलदार यांना केला यावर सभागृहात शांतता पसरली. आम्हाला ही सदस्याची यादी द्यावयाची आहे. त्यावर निर्णय द्यावा अशी विनंती राजीव देशमुख यांनी केली.

भाजपचे गटनेतेपदी संजय पाटील
पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नूतन गटनेते संजय पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन केले. महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी पदापासून आपली संघटन कौशल्य असलेले संजय पाटील हे चाळीसगाव एजुकेशन सोसायटीचे संचालक, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे दुय्यम सचिव आहेत माजी पंचायत समितीचे व जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काम पाहिले आहे. जामदा गावाचे तरुण नेतृत्व म्हणून त्यांनी तालुक्यात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मावळते गटनेते यांचे मौन !
आजच्या सभेसाठी सत्ताधारी भाजप सदस्यांना व्हिप बजाविण्यात आला होता. मात्र त्यावर नूतन गटनेते संजय पाटील यांची सही होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली गटनेते राजेंद्र चौधरी यांची गच्छंती ची चर्चा खरी ठरली. राजेंद्र चौधरी हे पालिकेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत ते सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत. पंचवीस वर्षे विरोधी पक्षात त्यांनी पालिका दणाणून सोडली असल्याचा इतिहास असताना त्यांना पक्षाने तातडीने गटनेते पदावरून काढताना कुठलीही मागमूस लागू दिली नाही यावर ते सभागृहात काय बोलतात याची सर्वांना उत्सुकता होती मात्र त्यांनी सभेत मौन बाळगले. पद गेल्याचा तणाव त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. पक्षाच्या वतीने तीस वर्षे नगरसेवक असलेले राजू आण्णा यांची गच्छंती शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.