चाळीसगाव पोलिसांचे अवैध दारूभट्ट्यांवर छापे

0

चाळीसगाव – चाळीसगाव शहर पोलिसांनी 19 रोजी तालुक्यातील टाकळी प्र चा येथे गावठी दारु भट्टी व शहरातील देवी गल्ली जवळ अवैध गावठी दारु विक्रीच्या ठिकाणी छापा मारुन एकास अटक केली. एक हजार 200 रुपयांची दारु ताब्यात घेण्यात आली तर 21 हजार 200 रुपयाचे दारुचे रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. टाकळी प्र.चा येथील तितूर नदीपात्रात गावठी दारु तयार करण्याच्या भट्टीवर 19 रोजी दुपारी 2.45 वाजता छापा मारुन 21 हजार 200 रुपये किमतीचे गुळ, मोह, नवसागर मिश्रीत गावठी दारु तयार करण्याचे रसायन व भट्टीचे साहीत्य ताब्यात घेवून जागेवर नष्ट केले. यावेळी भट्टी चालक शिवा छगन दवे हा मात्र पसार झाला आहे. त्याच्याविरोधात कॉन्स्टेबल प्रकाश कोळी यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत. दुसरी कारवाई शहरातील देवी गल्ली येथे मटन मार्केटजवळ करण्यात आली. दीपक भिवसन अहीरे (38, रा.देवी गल्ली, हॉटेल सदानंद मागे, चाळीसगाव) यास 1200 रुपये किमतीची 30 लिटर गावठी दारुसह ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहेत.