चाळीसगाव – चाळीसगावकडुन मालेगावकडे जाणार्या बसला कंटेनरने मध्यभागी धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचे नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठी हानी टळली. हा अपघात चाळीसगाव मालेगाव बायपासवर 19 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता घडला. चाळीसगाव आगाराची बस (एम.एच.14 बी.टी 2202)ही चाळीसगावकडुन मालेगावकडे जात असताना औरंगाबाद बायपासवरुन मुंबईकडे जाणारा कंटेनर (एम.एच.06 के 7022) च्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर बसच्या मध्यभागी धडकला. बस चालक योगेश जठार यांनी प्रसंगावधान राखुन बस लागलीच पुढे घेतल्याने कंटेनर बसला घासत गेल्याने बसचे जवळपास 15 हजाराचे नुकसान झाले. याप्रकरणी चालक योगेश जठार व वाहक रत्नाकर साळुंखे यांनी बस चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कंटेनर चालकाविरुद्ध तक्रार नोंदवली.
दहीवद फाट्यासारखी पुनरावृत्ती टळली
चाळीसगाव धुळे रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील दहीवद फाट्याजवळ मागील दिड वर्षापूर्वी कंटेनरने बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस मध्यभागी कापली जावुन जवळपास 24 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या अपघाताने संपूर्ण परीसर हादरला होता. याचीच पुनरावृत्ती मंगळवारी टळली तर सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नाही.