चाळीसगाव । नैसर्गिक आपत्ती व मान्सून पुर्व करावयाच्या कामकाजासाठी तहसिल कार्यालय भडगाव येथे तहसिलदार सी.एम.वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी गट विकास अधिकारी सुभाष जाधव, नायब तहसिलदार अमित भोईटे, मुकेश हिवाळे, विज वितरण कंपनीचे अभियंता शुक्ल, तालुका कृषी अधिकारी जाधव, उमेश शिर्के, संदीप बडे यांच्यासह तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख व सर्व बँक शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी तहसिलदार श्री.वाघ यांनी मान्सूनपुर्व करावयाच्या कामांचा प्रत्येक विभाग निहाय आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ग्रामसेवक व तलाठी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून आपत्कालीन परिस्थितीवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सज्ज रहावे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ वरिष्ठांना कळविण्याबाबत सुचना देण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीमध्ये संबंधित गावातील कर्मचार्यांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचार्यांच्या नावांच्या याद्या भ्रमणध्वनीक्रमांकासह मागविण्यात आल्या.
वीज कंपनीच्या तक्रारी निवारणाचे आदेश
नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी सुचना देण्यात आल्या. विज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी वाकलेले इलेक्ट्रीक पोल, धोकादायक लोंबकळणार्या तारा आदि बाबत तात्काळ दुरुस्तीसह यंत्रणा अद्यावत ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले. तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकार्यांनी जलयुक्त शिवार योजनेसह रोजगार हमी योजनेतील कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे अशा सुचना उपस्थितांना तहसिलदार श्री.वाघ यांनी दिल्या. मुद्रा लोन योजनेचा प्रचार व प्रसार करा. केंद्र शासनाच्या मुद्रा लोन योजनेबाबत संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा आढावा घेण्यात आला यावेळी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करुन मुद्रा लोन योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचनाही तहसिलदार सी.एम.वाघ यांनी यावेळी दिल्या.