चाळीसगाव येथे विजेच्या धक्क्यानेे 2 गायी दगावल्या

0

चाळीसगाव । विजेच्या खांबात वीज प्रवाह उतरल्याने अंग घासत असलेल्या गायीला विजेचा धक्का बसल्याने व दुसर्‍या गायीचा त्या गायीला स्पर्श झाल्याने दोन्ही गायी दगावल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी 8 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगरात घडली. घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुवर्णाताई नगर येथे दीपक रोहिदास बागुल यांच्या मालकीची 10 वर्षीय 50 हजार रुपये किमतीची गाय व एक बेवारस गाय चारा खात फिरत असताना बाजूलाच असलेल्या विजेचा प्रवाह उतरलेल्या विज खांबाला स्पर्श झाले. बागुल यांनी तात्काळ वीजवितरण कंपनीचे अधिकार्‍यांशी संपर्क करुन माहिती दिल्यावरून त्यांनी कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली. एरिअल बंच केबल (वीज वितरण कंपनीची पिळदार ए.बी. केबल) विजेच्या खांबाला घासली जाऊन तिच्या वरचे आवरण निघाल्याने वीज प्रवाह लोखंडी खांबात उतरल्याने ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेबाबत पशु वैद्यकीय व विद्युत निरीक्षक याना माहिती देण्यात आली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल जळगाव वरिष्ठ कार्यालयाला पाठविणार असल्याचे सांगितले.