चाळीसगाव शहरातील रस्त्याचे पहिल्याच पावसात तीन तेरा!

0

चाळीसगाव । चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्वात जास्त निधीतून मागच्याच आठवड्यात डांबरीकरण झालेल्या दयानंद हॉटेल ते खरजई नाका रस्त्यावर पहिल्याच पाऊसानंतर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पहिल्याच पावसाउ रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने कारभार चव्हाट्यावर आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाचे काम करून 55 लाखांपेक्षा जास्तचा निधी लाटल्याचा आरोप प्रभाग क्र.4 च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण सभापती रंजनाताई यशवंतराव सोनवणे यांच्यासह नागरिकांनी केला आहे.

डांबराचा वापर कमी
पालिकेने ठेकेदारामार्फत हा रस्ता करतांना डांबराचा वापरच कमी केला असून डब्ल्यूबीएम लेवल नीट केली नाही तसेच साईडपट्ट्यांचे कामच न केल्याचे एवढा खर्च करूनही जनतेच्या पैश्यातून केलेला हा रस्ता निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे संबंधित ठेकेदाराचे देयक अदा न करता 24 एप्रिल 2017 च्या शासन निर्णयानुसार डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर किमान 15 वर्षे खड्डे पडू नयेत, मात्र जर खड्डे पडलेत तर त्या ठेकेदारावर व नगरपालिकेच्या प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका रंजनाताई सोनवणे यांनी तसेच प्रभाग 4 च्या नागरिकांनी केली आहे.

तक्रार करणार
दरम्यान, रंजनाताई सोनवणे लवकरच न पा गटनेते राजीवदादा देशमुख, जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

जनतेच्या तोंडाला पाने
लवकरच नवीन तरतुदीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जनतेच्या हिताचे काम व्हावे म्हणून लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे नगरसेवक रंजनाताई सोनवणे रविंद्र चौधरी यांनी कामाबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेच्या तोंडाला पानेच पुसल्याची प्रतिक्रिया सोनवणे यांचे जनसंपर्क अधिकारी भैय्यासाहेब महाजन यांनी दिली.