चिंचपाणी धरणातील पाणीसाठा केवळ 30 टक्के

0

धानोरा । सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या व धानोरा परिसरात शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचपाणी धरण पावसाळ्यात न भरल्याने त्यात केवळ तीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. चिंचपाणी धरण कोरडेठाक असल्याने परिसरातील शेतकर्‍यांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाला होता यावर्षी तरी धरण भरेल अशी अपेक्षा होती मात्र यावर्षीही निराशा पदरी पडली आहे. धानोर्‍यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेले हे धरण शेतकर्‍यांसाठी वरदानच ठरलेले आहे. धरण व्हावे यासाठी बरेच संघर्ष करावे लागले, संघर्षाला यश आले मात्र अपुर्‍या पावसामुळे संघर्ष वाया जात असतांना दिसत आहे. माजी आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात धरण व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता.

सिंचनक्षमता 350 हेक्टर
आदिवासी उपाययोजना अंतर्गत अर्थअसहाय्यीत निधीतून बांधण्यात आला आहे. साठवण चिंचपाणी धरणाची लांबी 540 मिटर असुन या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 84.91 दलघफू आहे. या धरणाची सिंचनाची क्षमता 350 हेक्टर असल्याने धानोरा परिसरातील शेतकर्‍यांना चिंचपाणी धरण वरदान ठरणार असले तरी ते अद्याप कोरडे असल्याने त्याचा परिणाम उन्हाळ्यात मोठया प्रमाणावर जाणवणार आहे. विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या धरणाची उंची वाढवून धरणाची साठवण क्षमता वाढवली, मात्र आता दमदार पाऊस पडला नसल्याने धरण कोरडेठाक आहे, धानोरा परिसरात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र आता अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकरी चिंतीत आहे.