चिंचवडच्या एका खेळाडूची अंडर १९ क्रिकेट संघात निवड

0

पुणे – श्रीलंका दौऱ्यावर जाणारा १९ वर्षीय भारतीय क्रिकेट संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला कारण म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची भारतीय संघात निवड झाली आहे. दरम्यान अर्जुनसोबतच पिंपरी चिंचवडच्या पवन शाह याची देखील निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.

चिंचवडच्या संभाजीनगर येथील पवन शाह याची १९ वर्षाखालील गटात भारतीय क्रिकेट संघात सलामीचा फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीने पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध क्षेत्रात पिंपरी-चिंचवड आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. सध्या सर्वात लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे क्रिकेट, या खेळातही आता शहरातील खेळाडू देशासाठी खेळणार आहे. गेल्या ८ वर्षापासून पवन थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत सराव करतो आहे. सलामीला वेगाने धावा करणारा फलंदाज म्हणून त्याची खास ओळख आहे. श्रीलंका दोऱ्यावर त्याची निवड झाल्याने त्याने जोरदार सराव सुरू केला आहे.