चिंचवडमधील अवैध हॉटेल्सवर कारवाई करावी

0

ग्राहक हक्क संघर्ष समितीची मागणी

चिंचवड : चिंचवड, सांगवी परिसरामध्ये रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकड या भागात अवैधपणे सुरू असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ग्राहक हक्क संघर्ष समिती व ग्राहक सेवा संस्थेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात समिती व संस्थेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रहाटणी, पिंपळेसौदागर आणि वाकड परिसरातील बहुतांश हॉटेल सरकारचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. येथील हॉटेल्स प्रशासनाला न जुमानता पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्यासाठी नाईट चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून लूट केली जाते. सर्वच पदार्थ वाढीव किंमतीत विकले जातात. त्याला विरोध करणार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत हॉटेल चालकांची व कर्मचार्‍यांची मजल गेली आहे. त्यामुळे याची दखल घेऊन परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच समाजिक सलोखा व शांतता ठेवण्यासाठी अवैधपणे चालणार्‍या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.