पिंपरी-चिंचवड : सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाला आपला पाय गमवावा लागला. मात्र या अपघातात चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेवान्ना अश्रुबा कोपणार (वय 35 रा. चोपडेवाडी, बीड) असे मयत चालकाचे नाव आहे. बुधवारी (दि. 20) सकाळी चिंचवड गाव येथे हा अपघात झाला होता. यावेळी वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप रेवन्नाचा भाऊ पोपट कोपणार यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. यामध्ये त्यांनी संबंधीत पोलीसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
पोलिसांनी ट्रकमधून खाली ओढले
माझ्या भावाचा पाठलाग करुन पोलिसांनी त्याला चालू ट्रकमधून खाली ओढले. ट्रक उतारावर असल्याने यावेळी तो पोलिसांशी बोलत असताना ट्रक पुढे जाऊ लागला तो थांबवण्यासाठी त्याने प्रयत्न केला असता हा अपघात घडला ज्यात त्याचा मृत्यू झाला. पोलीस तो ट्रक बाजूला घेवून थांबवूनही चौकशी करु शकले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही. माझ्या भावाचे कुटुंब त्याच्यावर आधारीत होते. त्यामुळे पोलीसांनी संबंधीत वाहतूक पोलीसांवर कारवाई करावी अशी मागणी पोपट कोपणार यांनी केली आहे.
वाहतुकीचे नियम मोडत असेल तर त्याला थांबवून चौकशी करणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही त्याला थांबवले. मात्र त्याला चालू ट्रकमधून ओढले नाही. आमची महिला कर्मचारी घटनास्थळावर होती. त्या एका इसमाला अशा चालू ट्रक मधून खाली ओढणार नाहीत. त्यामुळे आमच्या चुकीमुळे नाही तर त्याचा ट्रक जुना होता, तसेच त्याने हँडब्रेक लावला नव्हता त्यामुळे ट्र आपोआप पुढे गेला आणि अपघात घडला. त्यामुळे या प्रकरणात नेमके खरे काय हे चौकशीनंतरच समोर येणार आहे.
-संजीव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिंचवड विभाग