नगरसेविका चिंचवडे यांनी केला निषेध
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरुन देखील शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात देखील पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने संताप व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी महासभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांचा निषेध केला. त्यामुळे परिसरात समान व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला द्याव्यात, अन्यथा महिला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही नगरसेविका चिंचवडे यांनी दिला.
हे देखील वाचा
महिला झाल्या त्रस्त
अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, शहरातील अनेक महिला नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपले सण, संस्कृती संवर्धनाचे काम करतात. अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची दिनचर्या, दैनंदिन कामकाज बिघडून नागरिक व महिला भगिनींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही भागात केवळ अर्धा तास आणि ते देखील कमी दाबाने पाणी पुरवले जाते. पाणी न येणे, उशिरा येणे, कमी दाबाने येणे, यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. महापालिकेचे ब्रीद वाक्य म्हणजे ‘कटीबद्धा जनहिताय’ यास अनुसरून सर्वांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. गणेशोत्सव कालावधीत चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा संपूर्णपणे विस्कळीत होता. त्या नंतरदेखील अपुर्या व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.