चिंचवड येथे नागरिकाच्या सतर्कतेमुळे शेकडो अपघात टळले

0

थेरगाव रस्त्यावर सांडले होते मोठ्या प्रमाणावर ऑईल

पिंपरी-चिंचवड : पुणे-औंध चिंचवड मेन रोडवर थेरगाव येथे सुमारे 500 मीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्त्याने येणा-या जाणा-या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता. मात्र ओमकार शेरे यांच्या सतर्कतेमुळे थेरगाव येथे रस्त्यावर शेकडो अपघातांचे संकट टळले आहे. ओमकार शेरे ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष आहेत.

अग्निशामक दलास कळवले
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पुणे औंध चिंचवड मेन रोडवर थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय ते गुजरनगर येथील ओव्हर ब्रिजपर्यंत मेन रोडवर ऑइल सांडल्यामुळे रोडवरून जाणार्‍या गाड्या घसरून पडल्या. यामध्ये अनेकांना जखमा झाल्या तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी शेरे यांनी संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर ड प्रभागातील अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. तात्काळ आलेल्या अग्निशामक दलाने 500 मीटर परिसरात सांडलेले ऑइल साफ करून रस्ता पूर्ववत केला.