जळगाव : जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील सत्तेचाळीस वर्षीय प्रौढाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नेहमीच रात्री दोन नंतरच घरी परतत असल्याने घरी आल्यावर प्रौढ आत झोपला व सकाळी कुटूंबीयांनी उठवले असतांना मयत झाल्याचे आढळून आले. मयताच्या गळ्यावर जखमेचे निशाण असुन कुटूंबियांच्या विरोधाला न जुमानता औद्योगीक वसाहत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात व तेथुन धुळे येथे रवाना केले. शवविच्छेदन अहवालावरुन नेमका प्रकार उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातील रहिवासी अशोक लक्ष्मण पाटील (वय-47) यांचा मृत्यु झाला आहे. अशोक पाटील हे बांधकाम ठेकेदार होते. त्यातच नेहमी प्रमाणे अशोक पाटील आपल्या दुचाकीवरुन शुक्रवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास उशिरा घरी परतले, घरी आल्यावर बाहेर ओट्याजवळ मोटारसायल आडवी पडलेली होती. घरात येवुन झोपल्यावर सकाळी त्यांच्या पत्नी शोभा यांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता ते मयत स्थितीत आढळून आले. सकाळीच कुटूंबीयांनी आक्रोश केल्याने गल्लीसहीत ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
कुटूंबियांचा आक्रोश
चिंचोली येथे प्रौढाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना झाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मयत झाल्यानंतर आता मृतदेहाची चिरफाड (शवविच्छेदन) नको म्हणुन कुटूंबीयांनी मृतदेह घेवुन जाण्यास पोलिसांना विरोध केला. मात्र कायद्याची बाजु समजुन सांगीतल्यावर पोलिस पाटील कर्मचार्यांच्या मदतीने अशोक पाटील यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुतार यांच्यासह इतर डॉक्टरांनी प्राथमिक पहाणी केल्यावर औद्योगीक वसाहत पेलिसांना आकस्मात मृत्युची खबर कळवली. पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली. यातच जिल्हा रूग्णालयात डिवायएसपी सचिन सांगळे देखील दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
गळ्यावर जखमेचे व्रण
मयत अशोक लक्ष्मण पाटील यांच्या गळ्यावर मारल्याचा ताजा व्रण असल्याने व कुटूंबीयांचा शवविच्छेदनाला विरोध का, म्हणुन पोलिसांचा संशय बळावला. अखेर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा प्राथमीक अंदाज घेतल्यावर मयत अशोक याच्या गळ्यावर स्वरयंत्राच्या जवळवापास दुखापत झाली आहे तर त्यांच्या खांद्याला तसेच हातालाव बोटांना खरचटलेले असुन घातपाताची शक्यता नाकारता येत नाही म्हणु मृतदेह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे रवाना करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांकडून त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार काय हे उघड होईल असे यावेळी एमआयडीसी पोलीसांनी सांगितले.