मुंबई / नवी दिल्ली – देशातील करोनाचे रुग्ण सलग तिसर्या दिवशी आठ हजारांहून अधिक संख्येने वाढले असून भारतातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. करोनाबाधितांच्या संख्येत आठवड्यापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. आता देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. असे असले तरी आनंददायी वार्ता म्हणजे, कोरोनामुळे होणार्या मृतांची संख्याही घटली असून देशातील कोरोनाबाधीत ठणठणीत बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे महिन्यामध्ये सुमारे साडेतीनपटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात ३१ मे अखेर ६७,६५५ रुग्णांपैकी २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मे अखेरीस राज्याचा ’रिकव्हरी रेट’ मार्चच्या तुलनेत सुमारे साडेतीनपटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे. राज्य सरकारने हाती घेतलेल्या उपाययोजना, लॉकडाउन, डॉक्टर, आरोग्य कर्मचार्यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र सरकारने सुधारित ’डिस्चार्ज पॉलिसी’ जाहीर केल्यामुळे बरे होणार्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी आठ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी ११वरून १७.५ दिवसांवर गेला आहे, असेही टोपे यांनी सांगितले.