चिंबळीचा कुणाल ‘पाटी’ लघुपटातून अभिनय क्षेत्रात!

0

‘असावरी फिल्म्स’ व ‘दुग्गल प्रोडक्शन‘ यांनी केली लघुपटाची निर्मिती

चिंबळी : येथील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या कुणाल ज्ञानेश्वर कड या बाल कलाकाराने ‘पाटी’ या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या अभिनयाने लघुपटात अधिक रंगत आली असून, हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती लघुपटाचे दिग्दर्शक डॉ. अवधूत मोहनशेठ वल्हवणकर यांनी दिली. सामाजिक विषयांवर भाष्य करणारी ’असावरी फिल्म्स’ व ’दुग्गल प्रोडक्शन्स’ यांचा हा लघुपट असून तो लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अनेक सामाजिक विषयांवर अगदी अलगद बोट ठेवत, ’पाटी’ समाज कल्याणाच्या चळवळीत एक वाटा घेते. या लघुपटाचे चित्रीकरण चिंबळी (ता. खेड ) येथे झाले आहे.

कुणाल आहे गुणी कलावंत
या लघुपटाच्या माध्यमातून चिंबळीच्या माध्यमिक शाळेत शिकणार्‍या कुणाल ज्ञानेश्वर कड या विद्यार्थ्याला अभिनय करण्याची संधी मिळाली आहे. कुणाल हा गुणी कलावंत असून या अगोदर त्याने आंतरशालेय नाट्य व नृत्य स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत. कुणाल हा गावाच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक ज्ञानेश्वर सदाशिव कड यांचा मुलगा आहे. त्याचा अभिनय असलेल्या या लघुपटाचे ग्रामस्थांकडून कौतूक होत असून, तो लघुपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.

उत्तम लघुपट
‘पाटी‘ लघुपटाचे दिग्दर्शक डॉ. अवधूत मोहनशेठ वल्हवणकर यांच्याशी जेव्हा मनमोकळेपणे ’पाटी’बद्दल संवाद झाला होता; त्यावेळी हा लघुपट सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा असावा, असा एकंदरीतच अंदाज बांधला. पण जेव्हा हा लघुपट प्रत्यक्षात पाहिला तेव्हा आश्चर्य वाटलं की, फक्त पाच मिनिटांत हा लघुपट किती महत्वाचा संदेश देऊन जातो. हा उत्तम लघुपट आहे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विद्यमान संचालक विलास कातोरे यांनी व्यक्त केले.

यांची आहे प्रमुख भूमिका
बालकलाकार कुणाल कड बरोबरच मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते संदीप सोमण यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला आलेल्या भूमिकेचा नि:स्वार्थ आदर करत तिला योग्य न्याय मिळवून दिलेला आहे. याबरोबरच अभिनेत्री ललिता मोरे व अभिनेते संदीप सोमण यांच्या अभिनय कौशल्याला दाद मिळवून देणारा एक सीन प्रेक्षकांना गहिवरून टाकणारा आहे. या बरोबरच कलाकार नीलेश कुलकर्णी, माऊली राऊत, सुरेखा वल्हवणकर, विजय देवगिरे, सहदिग्दर्शक सचिन भदाणे, विनय शेट्ट्ये, मेकअप आर्टिस्ट श्वेता मनोहर आदींनी महत्वाचा भाग सांभाळला आहे.