चिखलीच्या ओढ्यात मळीमिश्रीत घाण; नीरा नदीचे पाणी दूषित

0

नीरा । गेल्या दोन दिवसांपासून चिखलीच्या ओढ्यामध्ये मळीमिश्रीत काळेकुट्ट घाण पाणी वाहत असून ते पाणी नीरा नदीपात्रात मिसळत असल्यामुळे नीरा नदी दूषित होण्याच्या मार्गावर आहे. दुर्गंधीयुक्त घाण पाणी सोडणार्‍या कारखान्यास वेळोवेळी सांगूनही हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने पाणी प्रदूषण नियामक मंडळाच्या माध्यमातून खासगी कंपानीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नीरा नदीकाठच्या नागरिकांची व कळंब ग्रामस्थांची मागणी आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कारखान्याच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून अत्यंत दूषित व दुर्गंधीयुक्त काळे तैलयुक्त ऑइल मिश्रित घाण पाणी चिखलीच्या ओढ्यामध्ये सोडले जात आहे. हे घाण पाणी लगेच नीरा नदीपात्रात मिसळत असल्यामुळे नदीमधील जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चिखली व कळंब गावची वेस संबंधित ओढा असल्याने कळंब गावातील नागरिकांना घाण पाण्याच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. हे घाण पाणी भोरकरवाडीच्या बंधार्‍यातील साठवलेल्या पाण्यात मिसळत असल्याने नीरा नदीमधील मासे मृत पावण्याच्या मार्गावर आहे. तरी पाणी प्रदूषण नियंत्रण समितीने या परिस्थिती पाहून करून नीरा नदीमधील जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण करणार्‍या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी कळंब वासीयांची मागणी आहे.

कळंब गावची लोकसंख्या इंदापूर तालुक्यात सर्वाधिक असून गावाला पाणीपुरवठा करणार्‍या सार्वजनिक विहिरीमध्ये नीरा नदीमधील नव्याने खोदलेल्या विहिरीतील पाणी सोडले जाते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कारखान्या विरोधात वरीष्ठ पातळीवर तक्रार केली जाणार असल्याचे कळंबचे सरपंच उज्ज्वला फडतरे यांनी सांगितले. भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे म्हणाले, जलचरांना व पाणी प्रदूषीत करणार्‍या संबंधित प्रकल्पावर कुठला आहे. याचा निश्‍चितच शोध शासनाच्या पातळी शोध घेतला जाईल. याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रार तर करणार आहे; परंतु मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे निवेदन पाठवणार आहे.