पिंपरी-चिंचवड : इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी होण्यासाठी नदी सुधार प्रकल्पांतर्गत दोन हजार कोटींहून जास्त निधीची तरतूद करण्यात येईल. चिखलीतील एसटीपी प्रकल्पाचे लवकरच काम सुरू होईल. चिखली, मोशी, डुडुळगाव, चर्होली, तळवडे यासारख्या भागातील रस्ते व आवश्यक विकास प्रकल्पांचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. विश्व विवेक फाउंडेशन, चिखलीतील एसएनबीपी शाळा आणि एलआयसीच्या वतीने चिखलीतील एसएनबीपी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी महापौर काळजे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते यावेळी वृक्ष लागवड करण्यात आले. याप्रसंगी विश्व विवेक फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक बाबू नायर, नगरसेवक राहुल जाधव, एसएनबीपीचे संस्थापक डी. के. भोसले, प्राचार्या नीना भल्ला, रुपेश शर्मा, सागर कोटस्थाने, प्रसाद नायक आदी उपस्थित होते.
वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा
भावी पिढीत पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या 23 लाखांवर पोहोचली आहे. त्या मानाने वृक्षांची संख्या कमी आहे. म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने यावर्षी साठ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापौर काळजे यांनी केले. बाबू नायर यांनी यावेळी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना देशाचे संविधान, सार्वभौमत्व, पर्यावरणाबाबत व स्त्रीभ्रूण हत्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी, म्हणून शपथ दिली.