चिखलीतील घरकुल प्रकल्प लवकर पूर्ण करा; तयार घरांचे तातडीने वाटप करा

0
सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांची महापालिकेकडे मागणी
चिखली : येथील घरकुल योजनेतील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप केले जात नाही. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात देखील नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराला केवळ पोसण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या अनेक पात्र लाभार्थींनी बँकेतून कर्ज घेऊन स्वहिश्श्याचे पैसे भरले असून, त्यांना हक्काच्या घरासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच घराचा ताबा मिळाला नसताना बँकेचे कर्ज हफ्ते फेडावे लागत आहेत. या प्रकल्पातील काही घरे तयार असूनही त्याचा ताबा लाभार्थींना तातडीने देण्याची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे प्रकल्पातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन घरकुल प्रकल्पातील तयार घरे लाभार्थींना तातडीने वाटप करण्यात यावे. तसेच ठेकेदाराला पाठीशी न घालता कामाला वेग देऊन प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
विविध कार्यालयांचे झिजवले उंबरे
यासंदर्भात अजिज शेख यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या बीएसयुपी योजनेअंतर्गत चिखली येथे घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काची घरे देण्याचा उद्देश आहे. 2008 पासून सुरू असलेली ही योजना अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. दहा वर्षांत काही लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु, अनेक लाभार्थी अजूनही हक्काचे घर कधी मिळणार याकडे गेल्या दहा वर्षांपासून टक लावून पाहत आहेत. दुष्काळी भागातील शेतकरी ज्याप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करत राहतो, त्याचप्रमाणे चिखलीतील घरकुल प्रकल्पात घर मिळणार म्हणून पात्र लाभार्थी दहा वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. या योजनेसाठी पात्र ठरलेले लाभार्थींनी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन कार्यालयात तसेच कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी वेगवेगळ्या बँकेत, शासनाचे विविध दाखले मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात, नागरी सुविधा केंद्र, तहसिल कार्यालय यांसह इतर अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारल्या आहेत. या सर्व कार्यालयांची उंबरे झिजवल्यानंतर शेवटी कुठे तरी जाऊन हे लाभार्थी पात्र ठरले आहेत. तरीही या पात्र लाभार्थींना गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या स्वप्नाचे घर काही मिळत नाही.
वाटप न केल्याने घरांचा गैरवापर
घरकुल योजनेच्या फेज 1 मध्ये 6 इमारती दोन वर्षांपासून बांधून तयार आहेत. प्रशासनाकडून माहिती घेतली असता पवार-पाटकर या ठेकेदारामार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, महापालिकेने या इमारतीतील घरांचे वाटप न केल्याने त्यांचा गैरवापर होत आहे. तयार असलेल्या घरांची हागणदारी बनली आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. तयार घरांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. स्टिल चोरीला गेलेले आहे. घरातील इतर साहित्यही चोरीला जात आहेत. 285 लाभार्थी गेल्या 2 वर्षापासून पैसे भरुन घरकुलाची वाट पहात आहेत. 864 लाभार्थ्यांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे महापालिकेकडे जमा करून 6 महिने झाले आहेत. परंतु अद्याप त्यांना घराचा ताबा देण्यात  आलेला नाही. संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला असताना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसलेने इमारत वाटपाकामी दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे.