निगडी : येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मागील तीन-चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरातून उग्र वास आल्याने मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. निगडी पोलिसांनी कुजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. रमाकर फुलचंद राजभर (वय 30, रा. कुदळवाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रमाकर यांचे घर गेल्या तीन-चार दिवसापासून बंद होते. मंगळवारी त्यांच्या घरातून उग्र वास येऊ लागल्याने शेजार्यांनी पोलिसांना कळविले. निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी दरवाजा तोडला असता आत रमाकर यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला. रमाकर हा मित्रासोबत राहत होता. मागील काही दिवसांपूर्वी मित्र गावी गेला. तीन दिवसांपूर्वी रमाकर यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.