चिखलीत पसरले कच-याचे साम्राज्य  

0
परिसर स्वच्छ करण्याची मागणी 
पिंपरी : सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हाती असलेल्या भाजपने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले. मात्र, या अभियानालाही लाजवेल असे विदारक चित्र सोनवणे वस्ती ते चिखली परिसरात पहावयास मिळत आहे. कचरा अक्षरश रस्त्यावरुन वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  सोनवणे वस्ती ते चिखली रस्त्यावर  मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे ढीग साचले आहे. गेल्या आठ दिवसापासून खूप दुर्गंधी या संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे. यामुळे नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे.   रोगराई पसरण्यात सुरुवात झाली आहे , तरी प्रभाग क्र 1 मधील सर्वं नगरसेवकांनी याची नोंद घ्यावी. लवकरात लवकर, कचर्‍याची विल्हेवाट लावावी, अशी येथील नागरिक मागणी करत आहे. सफाई कामगार सुध्दा लक्ष देत नसून रस्ते साफ नसल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आदींनी शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान घेतले. त्याला नागरिकांचा प्रतिसादही मिळाला. दरम्यान, नागरिकांत स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीही करण्यात आली. पण याचा उपयोग काहीही झालेला नाही.  प्रभाग क्रमांक एकमध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचर्‍यामुळे रस्ताही ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मलेरिया, डेंग्यू, हिवताप अशा आजारांना निमंत्रण देणारी स्थिती निर्माण झाली आहे.