23 फायरमन पदे भरणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागातर्फे चिखली येथील उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. या अग्निशामक उपकेंद्राकरिता मानधनावर 23 फायरमन पदे भरण्यात येणार आहेत. पिंपरी महापालिका अग्निशामक विभागाची शहरात चार अग्निशामक केंद्र आहेत. संत तुकारामनगर येथे मुख्य केंद्र असून भोसरी, रहाटणी, प्राधिकरण येथे उपकेंद्रे आहेत. सध्या अग्निशामक विभागात सहा फायरमन मानधनावर कार्यरत आहेत. मात्र, त्यांची मुदतही 31 डिसेंबर 2017 रोजी संपुष्टात आली आहे. चिखली येथे आणखी एका उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. चिखली अग्निशामक उपकेंद्राकरिता मानधनावरील 23 फायरमन पदे भरण्यात येणार आहेत.
पदे भरण्यास आयुक्तांची संमती
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 29 मे 2017 रोजीच्या निर्णयानुसार महापालिका प्रशासन विभागाने मानधनावर नियुक्ती करण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, मानधनावरील पदे सहा महिने कालावधी करिता भरावी, कायमस्वरूपी पदावर दावा केला जाणार नाही, असे कर्मचार्यांकडून हमीपत्र घ्यावे. अग्निशामक विभागाने अत्यावश्यक सेवेची गरज लक्षात घेऊन आयुक्तांची स्वतंत्र मान्यता घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार, अग्निशामक विभागाला मानधनावर 23 फायरमन पदे भरण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार, चिखली अग्निशामक केंद्राकरिता मानधनावरील फायरमन पदे भरण्यात येणार आहेत.