चिखली, कुदळवाडी भागातील भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे ‘नोटीसा’

0

आमदार महेश लांडगे यांनी केला पाठपुरावा

पिंपरी : चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. भंगार व्यावसाय सात दिवसात बंद करावेत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिल्या 5 नोव्हेंबर रोजी दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 80 व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

चिखलीतील एका कंपनीला आग लागल्यामुळे त्याचा रिव्हर रेसिडन्सीमधील नागरिकांना मोठा त्रास झाला होता. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळ, महावितरण, महापालिका पर्यावरण, अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांसह परिसराची पाहणी केली होती. भंगार व्यावसायिकांमुळे झालेली विदारक परस्थिती पाहून आमदार लांडगे यांनी अधिका-यांवर संताप व्यक्त केला होता. भंगार जमा करणा-या व्यावसायिकांकडे महापालिका प्रशासनाचे का दुर्लक्ष होत आहे. मानवी जीवनास हानीकारक होणा-या वस्तूचे राजरोसपणे विघटन होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी चिंता आमदार लांडगे यांनी व्यक्त केली होती.

जे भंगार व्यावसायिक वायू प्रदुषण करत आहेत. त्यांना व्यावसायाकरिता लागणा-या सुविधा पाणीपुरवठा, विद्युत जोडणी कायमस्वरुपी बंद करण्याच्या नोटिसा देण्यात याव्यात. येत्या सात दिवसात भंगार व्यावसाय बंद करावा. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात यावी, असे निर्देश आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिले होते. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने या भागातील तब्बल 80 व्यावसायिकांना नोटीसा बजावल्या आहेत. यासंदर्भात या भागातील रॉयल फार्म, अध्यास, राधा-कृष्ण, सेलेस्टा, कॅपीटल सिटी रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज सोसायटी, कोलसस सोसायटी, वुड्स विले, कुमार प्रीन्स विले, ब्लू बेल्स आदी सोसायट्यांनी आमदार लांडगे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.