चितोडे ग्रामस्थ समस्यांनी त्रस्त

0

यावल । तालुक्यातील चितोडे गावातील हनुमान नगरमध्ये अनेक समस्यांपासून नागरिक त्रस्त असून त्यातच ऐन पावसाळ्यात रात्री पथदिवे बंद असल्याचे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात गावोगावी ग्रामपंचायतकडून रस्ते, पथदिवे, नाले सफाई आदी समस्या सोडविल्या जातात. याठिकाणी ग्रामपंचायत ही फक्त नावालाच आहे. गावातील समस्यांबाबत ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष होत असते. अनेक वेळा वारंवार तक्रारी करुनसुद्धा समस्या सुटण्याचे नाव दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पथदिवे नादुरुस्त
गावातील हनुमान नगरमधील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळेस येथून ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. पथदिव्यांअभावी येथे काळोखाचे साम्राज्य निर्माण होत असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस महिला वर्ग घराबाहेर निघण्यास धजावत नाही, तसेच अंधाराचा गैरफायदा घेत चोरीच्या घटना देखील घडू शकतात.

ग्रामपंचायतचे समस्यांकडे दुर्लक्ष
गावातील विविध समस्या असून त्या सोडविण्यासाठी कुणीही प्रयत्न करताना दिसत नाही, त्यामुळे गावातील समस्या ह्या कमी होण्याच्या ऐवजी वाढतच आहे. तसेच पावसाळा सुरु झाला असून देखील गावातील नाल्यांची नेहमी साफसफाई केली जात नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा अडकून पडला आहे. पावसामुळे नाल्या ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यांवर येऊन साचत असते. यामुळे परिसरात दुर्गंधी फैलावत असून नागरिकांचे आरोग्य संकटात सापडले आहे. या भागामध्ये एकही ग्रामपंचायत सदस्याचा रहिवास नसल्याने त्यांना या भागातील समस्या जाणवत नाही. गटारीतील सांडपाण्याचा निचरा योग्यप्रकारे होण्याकरिता सिमेंटच्या पक्क्या गटारींची निर्मिती करण्यात येते नाही, वस्तीतील सांडपाणी वाहणार्‍या मोर्‍याची साफसफाई नेहमीच करवून घेणे ग्रामपंचायतीची जबाबदारी असते. मात्र त्याकडे संबंधित पदाधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ग्रामसेवक गैरहजर
तसेच यंदाच्या वर्षात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लागणारे दाखले तसेच विविध कामगपत्रे मिळविण्याकरीता ग्रामसेवकांची गरज असते. परंतू या गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेविका असून नसल्यासारख्या आहे. मुलांना लागणारे दाखल्याकरीता ग्रामपंचायतच्या चकरा माराव्या लागत असतात. ग्रामसेविका यांचा तर वेळ नाही. ते कधी येतात आणि कधी जातात ते समजत नाही. नियमानुसार ठरविलेल्या वेळेत ते हजर नसतात.