चितोड्यातील युवकाचा निर्घृण खून : तीन संशयीत ताब्यात

Murder of a youth in Chitoda over a loan of four lakhs: Three arrested, including a woman यावल : तालुक्यातील चितोडा येथील 38 वर्षीय युवकाची उसनवारीचे चार लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून चाकूने गळा चिरून तसेच पोटावर व मानेवर चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या घडली असलीतरी खुनाचा प्रकार मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. मनोज संतोष भंगाळे (38, चितोडा, ता.यावल) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चितोडा गावातील कल्पना शशीकांत पाटील या महिलेसह अन्य दोन संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

मेसेज करून बोलावत केला खून
खून प्रकरणात यावल पोलिसात मयताचा भाऊ हेमराज संतोष भंगाळे (36) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे मोठे बंधू मनोज भंगाळे हे जमीन खरेदी व्यवहारात कमिशन एजंट म्हणून काम करीत होते शिवाय पत्नी व दोन मुलांसह चितोडा येथे वास्तव्यास होते. उसनवार म्हणून मनोजने गावातीलच बदाम गल्लीतील महिला कल्पना शशीकांत पाटील यांना उसनवार म्हणून चार लाख रुपये दिले होते मात्र संबंधित महिला पैसे परत देण्याबाबत वारंवार टाळाटाळ करीत होती. रविवारी रात्री सव्वा आठ वाजता कल्पना पाटील या महिलेने मनोजच्या मोबाईलवर मेसेज करून उधार दिलेले पैसे देण्यासाठी डोंगरकठोरा फाट्यावर बोलावले मात्र सोमवारी सकाळी भावाचा मृतदेह हाती आला. या प्रकरणी कल्पना शशीकांत पाटील यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गळा चिरून व वार करून केली हत्या
चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंद्रकांत निंबा चौधरी यांच्या चितोडा रस्त्यावर शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिस पाटील यांनी यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. यावलचे पोलिस राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी व पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मयत मनोज या युवकाच्या पश्चात पत्नी शुभांगी, मुलगी भाविका, मुलगा जयेश असा परीवार आहे.