चित्रकला,शारिरीक शिक्षणाच्या तासिका कमी

0

भुसावळ । पहिली ते नववी दरम्यान चित्रकला व शारिरीक शिक्षण विषयाच्या तासिका कमी करुन शिक्षण विभागाने कला शिक्षक व क्रिडा शिक्षक यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे या अन्यायकारक परिपत्रकाची होळी येत्या सोमवार 29 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचे राज्य कला व क्रिडा समन्वय समितीने कळविले आहे.

प्रत्येकी दोन तासिकांचे केले नियोजन
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शासन निर्णयानुसार विद्या प्राधिकरणाने गेल्या 28 एप्रिल रोजी परिपत्रक काढून विषयवार तासिकांचे नियोजन करून दिले आहे. त्यात पहिली व दुसरीला कला व क्रिडा विषयासाठी प्रत्येकी चार तासिका, तिसरी व चौथी तसेच पाचवीला कला व क्रिडा विषयासाठी प्रत्येक तीन तासिका, सहावीते सातवीला प्रत्येकी दोन तासिका अशा प्रकारचे नियोजन देण्यात आले आहे.

कला व क्रिडा विषयांची रुची कमी होणार
वास्तविक पाहता कला व क्रिडा धोरणानुसार तासिकांची हि संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे भविष्यात कला व क्रिडा विषयांची रूची कमी होणार आहे. पर्यायाने कला व क्रिडा शिक्षकांवर देखील अन्याय होणार असून या विषयाचे शाळेतील महत्व नगण्य होणार आहे. याकरिता राज्य कला व क्रिडा समन्वय समितीने राज्यसरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
पाचवी, आठवी कला व क्रिडा विषयांच्या तासिका कपातींचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे, नववी विषय व तासिका वाटप परिपत्रक रद्द करावे, माध्यमिक शाळेत निवृत्त होणार्‍या कला व क्रिडा शिक्षकांच्या जागेवर पूर्णवेळ शिक्षक नियुक्त करावा, अंशकालीन कला व क्रिडा शिक्षक नियुक्तीचे धोरण रद्द करण्यात यावे, या मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्हा पातळीवर येत्या 29 मे रोजी शिक्षण आयुक्तांच्या परिपत्रकाची होळी करुन कला व क्रिडा विषयाच्या शिक्षकांतर्फे निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 19 रोजी आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार असून दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव व आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. या आंदोलनास मुख्याध्यापक महासंघ, टीडीएफ, महाराष्ट्र शिक्षक परिषद, इंडियन बहुजन टिचर असो., शिक्षक भारती आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

स्पर्धांवर बहिष्कार टाकणार
मागण्या मान्य न झाल्यास 1 जुलैपासून राज्यातील शासकिय रेखाकला परिक्षा, शासकिय बालचित्रकला स्पर्धा व सर्व शासकिय क्रिडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कला व शारिरीक शिक्षण शिक्षक समन्वय समिती व सहयोग शिक्षण संघटनेच्या वतीने विजय बहाळकर, पी.आर. पाटील, एम.ए. कादरी, मल्लिकार्जुन सिंदगी, शालिग्राम भिरूड, शरदचंद्र धारुरकर, अनिल अदमाने, दादा भगाटे, हिरामण पाटील, प्रदीप साखरे, अशोक मंडले, चांगदेव पिंगळे, नरेंद्र बारई, किरण पाटील, विश्‍वनाथ पाटोळे, गुलाब मदने, द.वा. मुळे, सुभाष पाटील, दादा लाड, लक्ष्मण पाटील, शिवाजी मस्के, हुसेन खान, संजय पठाडे, यशवंत शिंदे, ज्योतीराम कांबळे, मकरंद कोर्‍हाडकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी दिला आहे.

शिक्षण विभागाने कला व क्रीडा विषयांच्या तासिका कमी करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर अन्याय करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शालेय जीवनात कला व क्रीडा विषयाची गोडी कमी होणार असून भविष्यात चांगले कलाकार व खेळाडू कसे निर्माण होतील? असा प्रश्‍न उपस्थित करून न्याय मिळावा यासाठी आंदोलन तीव्र करणार.
प्रदीप साखरे, जिल्हाध्यक्ष, शारिरीक शिक्षण शिक्षक संघटना