चित्रपटसृष्टीत जात-धर्म नाही; कष्ट बघितले जातात : डॉ. ओक

0

पुणे । मी चित्रपटसृष्टी या व्यवसायात आहे. या व्यवसायात ब्राह्मण, जातपात, धर्म हे काहीच बघितले जात नाही. तिथे फक्त तुमचा दिलेला शब्द, दिलेली वेळ, तुमचे कष्ट, तुम्ही काम कसे करता, किती प्रामाणिक, किती चोखपणे करता हेच बघितले जाते, असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले.महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या 92व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याई सभागृह, कोथरूड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संगीतकार प्रभाकर जोग अध्यक्षस्थानी होते. या वेळी सुरेश धर्मावत, गिरीश काळे, प्रकाश दाते, अतुल व्यास डॉ. दिलीप पटवर्धन, संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भालचंद्र कुलकर्णी, शिरीष काळे, नानासाहेब तुळशीबागवाले, भगवंतराव कुलकर्णी, विश्‍वास पटवर्धन, अभिजित अग्निहोत्री, संस्थेच्या अध्यक्षा, सुनीती दाते आदी उपस्थित होते.

डॉ. ओक म्हणाले, ब्राह्मण, ब्राह्मण समाज, जात या गोष्टींपासून आमच्या वडिलांनी आम्हाला नेहमी लांब ठेवले. व्हॉट्स अ‍ॅपवर एकदा आले, की पटेल लोक एकमेकांना कसे मदत करतात; तर मग ब्राह्मण ब्राह्मणांचे पाय का खेचतात? असा प्रश्‍न मला पडायचा. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आज बिझनेसच्या संदर्भात बरेच ग्रुप तयार झालेले आहे. त्यामध्ये तरुण ब्राह्मण पिढीचा जास्त समावेश दिसून येतो. ही चांगली गोष्ट आहे. केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश दाते यांनी प्रास्ताविक केले. अनुपमा कुलकर्णी यांनी ईशस्तवन सादर केले. अतुल व्यास यांनी आभार मानले.

विविध पुरस्कार प्रदान
अशोक देशमाने (स्नेहवन) यांना सामाजिक पुरस्कार देण्यात आला. सानिका नादगौडा (रोप मल्लखांब) यांना खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, उद्योजक पुरस्कार निरुता किल्लेदार (असीम फाउंडेशन) यांना देण्यात आला.