पुणे । आजपर्यंत अनेक वास्तवदर्शी चित्रपट केले, मात्र ‘इंदु सरकार’ चित्रपटामुळे झालेला त्रास मी कधीच विसरणार नाही. ‘आणिबाणी’वर यापूर्वी अनेक पुस्तके आली, वर्तमानपत्रामध्ये लिखाण झाले, दुरदर्शनवर माहितीपट आले त्यांना कोणी काही बोलले नाही. मी चित्रपटातून आणीबाणीवर बोललो तर काय चुकले? असा सवाल उपस्थित करत चित्रपट आणि कलाकारांनाच कायम लक्ष्य का केले जाते, अशी खंत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी रविवारी व्यक्त केली. सदाशिव अमरापुरकर मेमोरिअल ट्रस्टतर्फे आयोजित ‘दिग्दर्शकाच्या नजरेतून’ या रीमा अमरापुरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत भांडारकर बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागु, विनोद शिरसाठ, सुनंदा अमरापुरकर, राजाभाऊ अमरापुरकर आदी उपस्थित होते.
अमरापुरकर हे फक्त कलावंत नव्हते, तर संवेदनशील माणुसही होते. त्यांच्या नावाच्या ट्रस्टचा मी विश्वस्त आहे, याचे मी माझे भाग्य समजतो, असे विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. सदाशिव माणूस म्हणून मोठे होते. सामाजिक बांधिलकीची त्यांना ओढ होती. अतिशय संवेदनशील मित्र गेल्याने, माझाच एक भाग गेल्याचे मला वाटते, असे डॉ. अवचट यांनी सांगितले. प्रास्ताविक विनोद शिरसाठ तर सूत्रसंचालन उमेश गेवरीकर यांनी केले.
अमरापुरकर यांनी वाढविला विश्वास
व्हिडोओ कॅसेट विक्री करत असताना नेहमी वाटायचे की मी यात काही तरी करू शकतो, त्याप्रमाणे काही लोकांना याबद्दल विचारपूस करत होतो. काही लोकांनी सल्ला दिला की पुण्यात येऊन फिल्म इंटिट्युटमध्ये प्रवेश घे. मात्र तिथे गेल्यावर कळले की, इथे शिकण्यासाठी पदवी लागते. मात्र, मी तर सहावी पर्यंतच शिकलो होतो. मात्र त्यानंतर मी दिग्दर्शकाकडे सहाय्यक म्हणून काम पाहू लागलो. सदाशिव अमरापूकर यांनी सर्वांत पहिल्यांदा माझ्या उज्वल भविष्यावर विश्वास दाखविला. पहिलाच चित्रपट त्रिशक्ती आपटला. तरीही त्यांनी तू चांगले काम करून शकतो, असा विश्वास दाखवला. मला त्यावेळी अमरापूर म्हणाले होते की, तुला एखादी चांगली संहिता मिळाली तर तुझे चांगले नाव होईल. तसेच झाले चांदणी बारला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यापूर्वी केलेल्या चित्रटाची मागणी होऊ लागली.