मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याच्याविरोधात औरंगाबाद येथील न्यायालयाने पकडवॉरन्ट जारी केले आहे. एका कथालेखकाच्या मूळ कथेतील ढाचा चोरून रामूने अग्यात हा चित्रपट बनवला, असा मूळ लेखकाचा आरोप आहे. दोन वर्षांपूर्वीच या लेखकाने तशी कायदेशीर नोटीस वर्माला धाडलेली होती. पण त्याला उत्तरही न मिळाल्याने त्याने कोर्टात धाव घेतली आहे.
काही वर्षांपूर्वी मुश्ताक मोहसीन यांनी आपली ही कथा रामू वर्माला पोस्टाने पाठवली होती. त्याची पोचही मिळाली नव्हती. त्या कथेवर चित्रपट निघावा अशी त्यांची इच्छा होती. पण वर्माने त्यांना काहीही कळवले नाही. नंतर त्याचा अग्यात हा चित्रपट तयार झाला. प्रदर्शित झाला. तो बघितल्यावर मोहसिन यांना कथा आपलीच असल्याचे लक्षात आले. मात्र, चित्रपटाच्या श्रेय नामावलीत लेखक म्हणून नीलेश गिरकर व पुनीत गांधी अशी नावे होती. त्यामुळे विचलित होऊन मोहसिन यांनी रामू वर्माला कायदेशीर नोटीस धाडली होती.
नोटीसनंतरही वर्माने कुठलेही उत्तर दिले नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मोहसिन यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यावर कोर्टाने रामूला शोकॉज नोटीस जारी केली होती. त्यालाही कुठले उत्तर मिळाले नाही. म्हणूनच आता दोन वर्षे प्रतीक्षा केल्यावर रामूच्या विरोधात अजामीनपात्र वॉरन्ट जारी केले आहे.