पुणे । आजूबाजूला घडणार्या गोष्टींविषयी सतत जागरूक राहणे आणि त्यातील आपल्याला भिडणार्या गोष्टी डोक्यात साठवून ठेवणे हे चित्रपट लेखक व दिग्दर्शकासाठी फार महत्त्वाचे असते, असा सूर आंतराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांच्या चर्चेत उमटला. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तील ‘पिफ फोरम’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय तेंडुलकर स्मृती व्याख्याना’त इटलीचे प्रसिद्ध दिग्दर्शक मॉरिझिओ निशेती आणि मेक्सिकोचे दिग्दर्शक रॉड्रिगो प्ला यांनी चित्रपट बनवण्याची आपापली पद्धत उलगडत पटकथालेखन करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ते विषद केले.
व्यक्तीमत्त्वे समजून घेणे महत्त्वाचे
मला माझ्या चित्रपटांच्या काही गोष्टी वृत्तपत्रांमधील बातम्यांवरूनही सापडल्या आहेत. समोर दिसणारी व्यक्तीमत्त्वे समजून घेण्याचा प्रयत्न पटकथालेखक व दिग्दर्शकासाठी महत्त्वाचा असतो. पटकथा लिहिताना एकेक व्यक्तीरेखा पकडून तिच्या खूप जवळ जाणे आणि शेवटपर्यंत त्या व्यक्तीरेखेबरोबर राहणे गरजेचे आहे, असे प्ला यांनी सांगितले.
संवाद म्हणजे चित्रपट नव्हे
आजूबाजूला घडणार्या गोष्टी आपण बघत असतो. मला त्यात माझ्या मनातल्या कल्पना पेरून एक ‘फॅन्टॅस्टिक रिआलिझम’ चित्रपटात उभे करणे आवडते. माझी गोष्ट स्वप्नापासून सुरू करणे मला गरजेचे वाटते, असे निशेती यांनी सांगितले. मी मूकनाट्य आणि कार्टून्सच्या जगातून आलो. माझ्या पहिल्या चित्रपटात संवाद अजिबात नव्हते. खूप संवाद हे पुस्तकात, नाटकात किंवा रेडिओवर शोभून दिसतात. पण चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे चित्रपटांत संवाद गरजेचे असले तरी केवळ संवाद म्हणजे चित्रपट नव्हे. चित्रपटात घडणारी घटना जास्त महत्त्वाची असते, असे त्यांनी पुढे सांगितले.