पुणे । चित्रकार दत्तात्रय शिंदे यांनी काढलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या ‘व्हिलेज लाईफ’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. 9 ते 11 जानेवारी दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे भरविण्यात येणार आहे. खेड्यातील निसर्ग, तेथील माणसे, प्राणी, खेड्यातील घरे असे ग्रामीण जीवनातील विविध पैलू चित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
ज्येष्ठ चित्रकारांच्या हस्ते उद्घाटन
प्रदर्शनाचे उद्घाटन सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, शिल्पकार दिनकर थोपटे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार लोढा या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
जलरंग, तैलरंग, अॅक्रेलिक…
चित्रकार दत्तात्रय शिंदे यांचे संपूर्ण जीवन खेड्यात गेल्यामुळे ग्रामीण जीवन या विषयावर आधारित जेजुरी, सासवड, ओतूर, जुन्नर या परिसरातील चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. खेड्यातील घरे, डोंगर, गाई, मेंढ्या, बकरी, झोपड्या, धनगरांची पाले अशाप्रकारचे विषय आपल्या चित्रांच्या माध्यमातून रेखाटले आहेत. जलरंग, तैलरंग, अॅक्रेलिक या रंगांचा वापर करून ही चित्रे बनविण्यात आली आहेत.
खेड्यातील निसर्ग, घरे, माळराने… भावली
चित्रकार दत्तात्रय शिंदे हे चित्रकला शिक्षक असून ते मावडी क. प. या गावातील रहिवासी आहेत. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी आर्ट टिचर डिप्लोमा ही पदविका 1997 साली संपादित केली. विद्यार्थीदशेतच त्यांनी प्रा. विश्वनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलरंगात निसर्गचित्रांचे धडे गिरविले. जलरंगाचे तंत्र देखील आत्मसात केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेत नोकरी केली. नोकरीच्या व्यापातून वेळ काढून त्यांनी अनेक निसर्गचित्रे रेखाटली. खेड्यातील निसर्ग, तेथील घरे, माळराने त्यांना अधिक भावली आणि त्यांनी खेड्यातील जीवन आपल्या कलेद्वारे कागदावर उमटवले.