सावदा : चिनावल शेत शिवारात केळी कापून शेतकर्यांचे नुकसान करण्याचे सत्र थांबता थांबायला तयार नाही. गुरुवार, 14 एप्रिल रोजी रात्री 10 शेतकर्यांचे सुमारे 200 केळी खोड घडासहित कापून नुकसान करण्यात आल्याने शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाले आहे.
दोन महिन्यांपासून उपद्रव कायम
तब्बल 2 महिन्यांपासून चिनावल व परिसरातील शेती शिवारात शेतकर्यांचे पिक चोरी, नुकसानी यासारखे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. शेतकर्यांनी वारंवार पोलीस तक्रार, आंदोलन करुनही चोरटे पोलिसांच्या नजरेत येत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. शेतकरी एकत्र येत आंदोलन करूनही पोलिसांना यश येत नसल्याने या अज्ञात नुकसान करणार्या भामट्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दररोज घडणार्या घटनावरून दिसून येते.
10 शेतकर्यांना आर्थिक फटका
अशातच 14 रोजी रोझोदा रस्त्यावर असलेल्या तब्बल 10 शेतकर्यांचे सुमारे 200 केळी खोड घडासहित कापून नुकसान केले आहे. त्यात शेतकर्यांचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यात परेश मुकुंदा महाजन, चंद्रकांत धर्मा नेमाडे, सुहास पाटील, निखील विनायक गारसे, नरेंद्र गेदराज पाटील, विनोद टोके, संजय पोपट चौधरी, कैलास डोंगर भंगाळे यांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार शेतकर्यांना समजताच परेश महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे.