अमळनेर । गेल्या महिन्यापासून चीनच्या सैनिकांचे भारतीय सिमा रेषेवर आक्रमण वाढत आहे. घुसखोरी करून ते भारताशी युद्ध करण्याच्या तयारीत आहेत आपले जवानही त्यांना धैर्याने तोंड देत आहेत. एक भारतीय नागरिक म्हणून नुसती बघ्याची भूमिका न घेता आपणही जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढू शकतो, त्यासाठी नागरिकांना हातात बंदूक घेण्याची गरज नसून फक्त बाजारपेठेत येणारा चिनी वस्तू खरेदी बंद करण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे.
युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांची माहिती
देशात चिनी वस्तू खूप मोठया प्रमाणात विकल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या दशकापासून चीनची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. आपण सर्व भारतीयांनी जर ठरविले तर आपण चिनी अर्थव्यवस्था बिघडवू शकतो. देशाच्या एकूण आथिॅक उलाढालीत स्वदेशी वस्तुंच्या विक्रीबाबतची टक्केवारी घसरते आहे. प्रत्येक 30 भारतीयांमागे 1 नागरिक चिनी वस्तुंच्या खरेदीसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. आज भारतीय बाजारपेठेत जेवढ्या पण चिनी वस्तू आहेत, तेवढ्या जर आपण खरेदी केल्या नाहीत तर चीनची अर्थव्यवस्था कमजोर होईल. आपला कट्टर शत्रू असणारा पाकिस्तान या देशाला चीन आर्थिक मदत करते. त्यामुळे एक भारतीय या नात्याने आपण चीनला धडा शिकवला पाहिजे कारण भारत हा चीनची सर्वात मोठी बाजारपेठ असून आपण चिनी वस्तू खरेदी न करता एकप्रकारे देशसेवाच करीत आहोत. तसेच भारतीय बाजारपेठेत आलेल्या चिनी वस्तूची खरेदी न करण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे