चिनी सैन्य उत्तराखंडात घुसले!

0

नवी दिल्ली : चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 25 जुलैरोजी सकाळी 9 वाजता चिनी सैन्याने घुसखोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून चीनने उत्तर चीनमध्ये लष्करी सामर्थ्याचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. यावेळी युद्धासाठी तयार राहा, असा आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला दिला होता. त्यानंतर लगेचच चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नंतर हे सैन्य माघारी फिरल्याचेही लष्करी सूत्राने सांगितले.

केंद्राकडून दुजोरा नाही
भारत आणि चीनमध्ये डोकलाम प्रश्नावरुन प्रचंड तणावाची परिस्थिती असताना चिनी सैन्याने 25 जुलैरोजी उत्तराखंडातील बाराहोटी भागातील सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत घुसखोरी केली. अद्याप केंद्र सरकार किंवा सुरक्षा दलांनी यास दुजोरा दिलेला नाही. चिनी सैन्याने घुसखोरी करताच इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांनी जोरदार विरोध केल्यानंतर चिनी सैन्याने माघार घेतल्याचे समजते.

याआधीही चीनकडून घुसखोरी
भारत आणि चीनमध्ये बाराहोती सीमेवरुन कोणाताही वाद नाही. त्यामुळेच अशा प्रकारची घुसखोरी पुन्हा सहन केली जाणार नाही, असा इशारा भारताकडून देण्यात आला आहे. लडाख आणि सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी अनेकदा घुसखोरी केली आहे. बाराहोतीमध्येही याआधी चीनकडून घुसखोरी करण्यात आली आहे. चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोटीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती. विशेष म्हणजे, चिनी सैन्य सीमा ओलांडून थेट 1 किलोमीटर आत शिरले होते.