नवापूर:कोरोना महामारीत दोन महिन्यात लॉकडाऊन दरम्यान अर्थव्यवस्था बिघडली. त्याचा बळीराजाला सर्वाधिक फटका पडला.शेतीसाठी बँक व सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत असताना लॉकडाऊनमुळे झालेली परिस्थिती यात तो पार हतबल झाला. असे असतांना तग धरत पुन्हा शेती कामात लागला आणि पुन्हा चक्रीवादळाने शेतीचे नुकसान केले. अशा परिस्थितीत नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याचे दोन बैल विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर असे, नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा येथील गुलाबसिंग नाईक आपली बैलगाडी घेऊन चारा देण्यासाठी तलाईपाडा येथे जात होते.रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीत निसर्ग चक्रीवादळ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या विहिरीत पाणी तुडुंब भरलेले बघून बैलांनी पाणी पिण्यासाठी विहिरीजवळ गेले असता बैलगाड्यासहित विहिरीत कोसळले. सुदैवाने गुलाबसिंग नाईक यांना पोहता येत असल्याने ते विहिरीबाहेर निघून आले. परंतु जवळ जवळ ५० फूट खोल असलेल्या विहिरीत दोन्ही बैल बैलगाड्यासहित खाली गेल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गावातील नागरिकांनी बैलांना बाहेर काढले. ऐन पावसाळा समोर असतांना बळीराजावर संकट उभे केले आहे.