भुसावळ। मुलांना निसर्गाप्रती आवड निर्माण व्हावी, परिसरात असलेल्या वृक्ष, पक्षी, फुलं, फळ यांची माहिती होण्यासाठी वसाहतीमधील निसर्गप्रेमी मंडळींनी वसाहतीमधील मुलांना वसाहतीमध्ये फेरफटका मारुन आणला. सकाळी 6 वाजता डीएम सेक्टर पासून सुरुवात झाली. जमलेल्या 27 मुलांना पुढील परिसरात आढळणार्या 157 पक्षी आणि 23 प्रकारच्या झाडांची माहिती देण्यात आली.
झाडांच्या बिया केल्या गोळा
मार्गात येणार्या वृक्षांची माहिती देण्यात आली. कडूनिंब, सोनमोहोर, करंज, जांभूळ, गुलमोहोर आदी झाडांच्या बिया जमा करण्यात आल्या. दत्त मंदिराजवळ असलेल्या एकमेव रिठा झाडाची ओळख करून दिली.
विविध 27 वृक्षांची मुलांना झाली ओळख
अशाप्रकारे वेगवेगळ्या विविध 27 वृक्षांची ओळख मुलांना झाली. पक्षांचे विविध आवाज ऐकायला मिळाले.पक्षांचे निरीक्षण करता आले. पोपट, सुतार, टिटवी, कोकीळ, ढोकरी, शिक्रा, कबुतर, कोतवाल, शिंपी, भांगपाडी मैना, साळुंकी, बुलबुल, तांबट, हारोळी, सुभग, भारद्वाज, होला, हारोळी आदी पक्षी आढळले. रंगोली गार्डनमध्ये आल्यावर मुलांना पर्यावरणाच्याप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली. झाडांवर, प्राण्यांवर, पक्षांवर, झाडांचे संगोपन करा अशी माहिती देण्यात आली.
यांनी केले सहकार्य
चातक निसर्ग संस्थेचे संजय पाटील, लक्ष्मीकांत नेवे आणि बाबा जावळे यांनी वृक्षांची, पक्षांची ओळख करून दिली. मनोरंजनात्मक खेळ आणि हास्ययोग, योग शिक्षक रमेश भंडारी तर पर्यावरण संवर्धनासाठी मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, निसर्ग प्रेम वाढविण्यासाठी मोहन सरदार आणि शैलाताई सावंत यांनी संयोजकाची भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांना परिसरातील विविध झाडांच्या उपयोगितेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. अनिता पाटील आणि किरण बोरोले यांनी विशेष सहकार्य केले.