चिमुकल्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती

0

पिंपरी-चिंचवड : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर टाळून त्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले पाहिजे. हाच संदेश समाजात जावा, यासाठी पर्यावरण संवर्धन समितीतर्फे ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे’ या विषयावर पिंपळे निलख येथील महापालिकेच्या शाळेत विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद लाभला 178 विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. यावेळी नगरसेविका आरती चोंधे, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पवार, विकास पाटील, विनिता दाते, पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरूकर, दतात्रेय कुमठेकर, सुभाष चव्हाण, पिंपळे निलख मनपा शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते.

उपक्रमाचे मोफत आयोजन
सामाजिक दायित्त्व आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यातील खरा आनंद समाजाला मिळावा, हा या कार्यशाळेमागचा प्रमुख उद्देश होता. यावेळी मूर्तीकार दीपक कुंभार व कला शिक्षक सोमेश्वर त्रिम्बके यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. पर्यावरण संवर्धन समितीतर्फे हा उपक्रम पूर्णपणे मोफत आयोजित केला होता. अशा आणखी तीन कार्यशाळा शहरात आयोजित केल्या जाणार आहेत.

चिंचवडगावातही ‘इको फ्रेंडली गणपती’ कार्यशाळा
चिंचवडगावातील चैतन्य सभागृहात ’क कॅलिग्राफी’च्या वतीने इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अ‍ॅड. अभय आपटे यांनी इको फ्रेंडली गणेशमूर्तींचे महत्त्व पटवून दिले. यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना आणि अनाथ मुलांना शिल्पकार नितीन ठाकरे तसेच मंगेष डाखवे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विद्या दंडवते यांनी केले. शरद कुंजीर यांनी कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यशाळेचे आयोजन सुमित काटकर यांनी केले होते.