नंदुरबार । प्रकाशा येथून अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुली सुखरूप घरी परत आल्या असतांना नंदुरबार रेल्वे स्थानकावरून एका लहान मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्या परप्रांतीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एक कुटुंब बाहेर गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यांच्यासोबत आदित्य नावाचा एक साधारणतः 4 ते 5 वर्षचा मुलगा होता. या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न बिहार राज्यातील उद्यकुमार दास या परप्रांतीय तरुणाने केला होता.
पालकांमध्ये भितीचे वातावरण
मुलाचे अपहरण होत असल्राची बाब आदित्यच्या वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी बिहारी तरुणाला हटकले,हे पाहून त्या ठिकाणी प्रवासी नागरिकांची मोठी गर्दी जमली,या जमावाने त्या बिहारी तरुणाला चांगलाच चोप देऊन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात सध्या मुलांचे अपहरण करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, प्रकाशा येथून दोन लहान मुलींचे अपहरण करण्यात आले होते, त्या मुली गुजरात राज्यातील सुरत येथे सापडल्या,पोलिसांच्या मदतीने त्यांना घरी सुखरूप आणण्यात आले,ही घटना ताजी असतांनाच बुधवारी दुपारच्या सुमारास रेल्वे स्थानकावर लहान मुलाचा अपहरण करण्याचा प्रकार घडल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे, ताब्यात घेण्यात आलेला त्या तरुणासोबत आणखी टोळी आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.