पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळासमोरील (पीएमपी) ‘चिल्लर’चे संकट अद्याप संपलेले नाही. रिझर्व्ह बँकेने सूचना केल्यानंतरही केवळ वरिष्ठ अधिकार्यांकडून सूचना न मिळाल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेत सोमवारी ‘चिल्लर’ स्वीकारण्यास नकार दिल्याचे पीएमपीने सांगितले.
पीएमपीकडे दैनंदिन उत्पन्नात जमा होणारी ‘चिल्लर’ सेंट्रल बँक ऑफ इंडियाने गेल्या दोन महिन्यांपासून स्वीकारलेली नाही. ‘चिल्लर’ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बँकेने ती स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली होती. या प्रकरणी पीएमपीने रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमपी आणि सेंट्रल बँकेच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँकेला ‘चिल्लर’ स्वीकारण्याची सूचना केली होती. तसेच, पीएमपीला ‘चिल्लर’ जमा करण्यासाठी एक पद्धत निश्चित करून दिली होती. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने सोमवारी बँकेशी संपर्क साधला असता, वरिष्ठ अधिकार्यांकडून यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे पीएमपीला सांगण्यात आले. त्यामुळे पीएमपीची ‘चिल्लर’ सोमवारी बँकेत जमा करून घेण्यात आली नाही, असे पीएमपीच्या जनसंपर्क विभागाने कळविले.