चीनची मैत्री

0

भारताने चीनच्या कुटील धोरणांचा एकदा अनुभव अनेकदा घेतलेला आहे. त्यामुळे सध्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीनच्या दौर्‍यात असून चीन त्यांच्याशी मित्रत्वाच्या गोष्टी करत असला, तरी त्यात तथ्य नाही हेच सत्य आहे. साम्राज्यवाद हा चीनचा स्थायीभाव आहे. त्यामुळे भारताच्या सीमारेषेचा भूखंडावर अतिक्रमण करणे,छोटे देश काबिज करणे, हा चीनचा मनुबाच आहे, म्हणून चीनवर किती विश्‍वास ठेवायचा का?

युरोप दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यानंतर पुन्हा एक महत्त्वाचा आणि अवघ्या जगाचे लक्ष केंद्रीय करून घेणारा दौरा करणार आहेत. तो दौरा हा चीनचा दौरा असणार आहे. या दौर्‍यात पंतप्रधान मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. त्याआधी सध्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या चीनच्या दौर्‍यावर आहेत. तेथे त्यांनी चीनचे समकक्ष प्रतिनिधी वांग यी यांची बीजिंग येथे भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री यी यांनी मोदींच्या दौर्‍याबाबत माहिती उघड केली. 27 आणि 28 एप्रिल रोजी अनौपचारिक उच्चस्तरीय बैठकीत मोदी आणि जिनपिंग हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तत्पूर्वी सुषमा स्वराज्य यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठकीत द्विपक्षीय संबंधात सुधारणेसाठी आणि उच्चस्तरीय संवादाची गती वाढवण्यावर चर्चा झाली. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी आवर्जून दहशतवादाचा विषय मांडला. दोन्ही देश दहशतवाद, हवामान बदल आणि जागतिक आरोग्य यांसारख्या मुद्द्यांवर एकत्र काम करणार आहेत.

तर चीनकडून 2018 मध्ये सतलज आणि ब्रह्मपुत्रा नदीबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) मंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी सुषमा स्वराज चार दिवसांच्या दौर्‍यासाठी चीन दौर्‍यावर गेल्या आहेत. द्विपक्षीय भेटीपूर्वी वांग यांनी पेइचिंग येथील दिआयुतई स्टेट गेस्ट हाऊस येथे सुषमा स्वराज यांचे स्वागतही केले. स्टेट काऊंसिलर झाल्यानंतर वांग आणि स्वराज यांची ही पहिलीच भेट झाली. या भेटीदरम्यान, सुषमा यांनी वांग यांना स्टेट काऊंसिलर झाल्याबद्दल आणि भारत चीन सीमेसंदर्भात विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदनही केले. दरम्यान, वांग यांनी सांगितले की, द्विपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय विकास झाला आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या नेत्यांच्या देखरेखीखाली या वर्षी सकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत. आम्ही मुद्दाम या ठिकाणी सुषमा स्वराज यांच्या या दौर्‍याचा तपशील सविस्तर दिला आहे. तसेच पंतपधान मोदी दुसर्‍यांदा चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत, हेही नमुद केले आहे. भारत नेहमीच मैत्रीचा हात स्वतः पुढे करतो, हा भारताचा स्थायीभाव बनला आहे. भारतावर प्रथम आक्रमण करणारे शेजारील राष्ट्रे आहेत. मैत्रीसाठी मात्र कधीच प्रथम पुढाकार घेत नाहीत, तरीही मागील 70 वर्षे भारत हा पाकिस्तान काय किंवा चीन काय या दोन्ही देशांकडे मागील सर्व घटनाक्रम विसरुन नव्याने सुरुवात करण्याच्या हेतूने मैत्रीचा हात पुढे करतो. मागील चीनच्या दौर्‍यावर पंतप्रधान मोदी गेले होते. तेव्हा डोकलाम हा विषय बराच तापला होता.

अगदी दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल काय, अशी परिस्थिती होती, त्यावेळी मोदी स्वत: चीनच्या दौर्‍यावर गेले, तेथे दोन्ही राष्ट्र्रप्रमुखांमध्ये चर्चा झाली आणि डोकलाम संघर्ष शमला मात्र तो पूर्णपणे संपला नव्हता, कारण मागील दीड-दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा चीनने संघर्षाची भूमिका घेतली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘आमची जनता साहसी असून आम्ही शत्रूच्या विरोधात रक्तरंजित संघर्ष करायला सिद्ध आहोत. आमची एक इंचही भूमी शत्रूला देणार नाही.’ असे म्हटले होते. अर्थात ‘हे सर्व भारताला उद्देशून त्यांनी म्हटले आहे’, हे कोणीही सांगू शकेल. हा देश विस्तारवादी धोरणाचा आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशवरही तो स्वतःचा अधिकार सांगत असतो. काही मासांपूर्वी त्याने भूतानचा प्रदेश असलेल्या डोकलामवर अधिकार असल्याचे सांगितले आणि त्यादृष्टीने तेथे स्वतःच्या कारवाया चालू केल्या. हा प्रदेश जर चीन या देशाचा होता, तर इतकी वर्षे तो गप्प का बसला होता? त्याच्यासारखा विस्तारवादी देश अशी चूक करू शकतो का? डोकलामच्या संदर्भात त्याने अरेरावी केली आणि भारताशी कित्येक महिने वाद घातला. शी जिनपिंग यांना चीनचे आजन्म राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. जनतेकडून मिळणारा आधार त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारा आहे. त्यामुळेच त्यांनी रक्तरंजित संघर्ष करण्याची धमकी दिली आहे. त्याही पुढे जाऊन ते म्हणतात, “जगात अव्वल स्थान मिळवण्याची कुवत चीनमध्ये आहे.” म्हणजे चीनचे खरे मनसुबे त्यांनी बोलून दाखवले आहेत. चीनला जागतिक शक्ती बनायचे आहे. अमेरिकेचा म्हणूनच तो हेवा करत असतो. इतर गोेष्टी काहीही असल्या, तरी भारतासमवेतचे संबंध ताणलेले ठेवण्यात त्यांना समाधान मिळत असते.

भारताची अर्थव्यवस्था आपल्याहून वरचढ होईल, ही भीती चीनला सतावत असते. त्यामुळे भारताला नेहमी दबावाखाली ठेवण्याचे चीनचे धोरण आहे. त्यामुळे त्याने आता शत्रूदेशासमवेत म्हणजे भारतासमवेत रक्तरंजित संघर्ष करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. भारतानेही चीनच्या या धमकीविषयी विचार करायला हवा. चीन हा विश्‍वास ठेवण्यासारखा देश नाही, हे सर्व जगाला माहीत आहे. त्यामुळे ‘ही केवळ धमकी आहे’, असे म्हणून भारतीय सरकार शांत बसू शकत नाही. चीनला मधूून मधून भारतीय सीमेजवळ सैन्य पाठवण्याची एक सवय लागलेली आहे. त्याप्रमाणे कित्येक वेळा भारतीय सीमेजवळ चिनी सैन्य गोळा झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून झळकत असतात. असे करून न कळत तो भारतीय प्रदेशावर आक्रमण करू शकतो. भारत सरकार सावध नसतांना जर चीनने आक्रमण केले, तर तो खचितच रक्तरंजित संघर्षच ठरेल. कम्युनिस्टांचे रक्त ज्यांच्या धमन्यातून वहात आहे, त्यांना संघर्षच प्रिय आहे. त्यांना अशा प्रकारे घडणारा संघर्ष समाधान देणारा असेल. भारत सरकारने चीनच्या धोरणांचा एकदा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आता सुषमा स्वराज यांच्या दौर्‍यात चीन जरी मित्रत्वाच्या गोष्टी करत असला, तरी त्यात तथ्य नाही हेच सत्य आहे. साम्राज्यवाद हा चीनचा स्थायीभाव आहे. त्यामुळे भारताच्या सीमारेषेचा भूखंडावर अतिक्रमण करणे,छोटे देश काबिज करणे, हा चीनचा मनुबाच आहे, भारताने आता किती विश्‍वास ठेवायचा हा खरा विषय आहे.