चीनच्या पाणबुडीचा भारताला धोका

0

बीजिंग । दिवसेंदिवस चीन लष्करी तंत्रज्ञानात भारताच्या पुढे झेप घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. चीनने एक नवे शस्त्र बनवले आहे. चीनने पाण्याच्या खालून शत्रूंना लक्ष्य करणारी एक जबरदस्त पाणबुडी बनवली आहे. चीनने बनवलेली पाणबुडी ही जगातील सर्वात भयंकर आणि शक्तिशाली पाणबुडी असल्याचा दावा चीनच्या वैज्ञानिकांनी केला आहे. जगभरात शस्त्रास्त्रे स्पर्धेत नंबर वन बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनच्या या पाणबुडीचा भारताला धोका आहे.

लढाऊ विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते
ही पाणबुडी शांघायमध्ये बनवण्यात आली असून, याची माहिती चीनची सर्वात मोठी संशोधन संस्था चायनीज अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सने दिली आहे. संशोधकांच्या मते, ’सुपर कंडक्टिव्ह मॅग्नेटिक एनोमली डिटेक्शन एरे’ हे या पाणबुडीचे नाव आहे. ही पाणबुडी समुद्रातील खनिजांचा शोध घेण्यासोबतच दुस-या पाणबुडीला शोधून काढण्यास सक्षम आहे. या पाणबुडीतील रिअ‍ॅक्टर हवेत राहून खनिजांची योग्य जागा दाखवण्यासाठी समर्थ आहेत. चीन या पाणबुडीचा उपयोग नागरिक किंवा लढाऊ विमानांना लक्ष्य करण्यासाठी करू शकतो.

लवकरच सैन्यदलात समावेश
चिनी लष्कर लवकरच या पाणबुडीला स्वतःच्या सैन्यदलात सामील करून घेणार आहे. या पाणबुडीत चीनच्या जुन्या पाणबुडीपेक्षा वेगळे डिव्हाइस बसवण्यात आले आहे. नव्या पाणबुडीमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे अत्याधुनिक आहे, तेच त्या पाणबुडीचे यश आहे, अशी माहिती चीनचे वैज्ञानिक डॉ. ली चाँग यांनी दिली आहे.