बीजिंग : चीनने कैलाश मानसरोवरची तीर्थयात्रा रोखली असून, सिक्कीम सीमेवर यात्रेकरुंची एक तुकडी रोखून धरली आहे. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगूनही चीन आपली हटवादी भूमिका सोडायला तयार नाही. शिवाय, वादग्रस्त सीमेत प्रवेश केल्याचा आरोप करत, भारतीय जवानांनादेखील परत जा, असे फलक चीनच्या सैन्याने भारतीय सैन्याला दाखवले आहेत. चीनने यात्रेकरूंना नाथू ला र्दा येथेच रोखले असून, पुढील रस्ता बंद केला आहे. भारतीय सैन्याने चीनच्या भूप्रदेशात घुसखोरी केल्याचा ठपका चीनने ठेवला असून, राजधानी दिल्ली व बीजिंग येथेही राजनैतिक विरोध दर्शविला आहे.
भारताने सीमांचा आदर करावा : चीन
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की भारतीय सैन्याच्या व नागरिकांच्या चीनच्या सीमेत घुसखोरीबद्दल आम्ही भारताकडे तक्रार दाखल केलेली आहे. आपल्या सीमारेषेचे संरक्षण करण्यात चीन सक्षम असून, शेजारी राष्ट्रानेही परस्परांच्या सीमांचा आदर राखावा. भारताने आपले सैनिक ताबडतोब परत बोलवावेत, काही सैनिक फारच पुढे आले असून, ही निषेधार्ह बाब आहे, असेही कांग म्हणाले. नाथू ला र्दा येथील सीमेद्वारे तिबेटमध्ये प्रवेश होतो. हा रस्ता केवळ सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. भारतीय यात्रेकरूंचा या मार्गे प्रवेश हा सुरक्षेच्या कारणास्तव रोखण्यात आल्याचेही कांग यांनी चीन सरकारतर्फे स्पष्ट केले.
हे आहे चीनच्या पोटदुखीचे प्रमुख कारण!
चीनने या भागात एका रस्त्याचे निर्माणकार्य हाती घेतले होते. परंतु, भारतीय लष्कराने ते बंद पाडले. भारतीय सीमारेषेनजीक हे काम होत असल्याने लष्कराने या कामावर आक्षेप घेतला होता. त्याचा बदला म्हणून चीनने मानसरोवर यात्रेला जाणार्या 47 भारतीय यात्रेकरूंचा रस्ता रोखला असल्याची माहिती लष्करीसूत्राने दिली. नाथू ला र्दा हा भाग समुद्रसपाटीपासून 4,545 मीटर उंचीवर असून, स्वतंत्र तिबेट, शिगात्से विभागातील यादोंग आणि सिक्कीमच्या मध्यभागी येतो. त्यामुळे सीमारेषेचा मूळ प्रश्न या ठिकाणी कायम आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी भारत व चीनमध्ये द्वीपक्षीय वार्तालाप सुरु आहे.