चीनपासून सावधानच राहा!

0

भारताने दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे विधान भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. यातून त्यांनी चीनशी युद्ध झाल्यास त्याच वेळी पाकिस्तानसोबतही लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सुचवले आहे. नेमके हेच चीनला पटले नाही. पंतप्रधान मोदी चीनच्या दौर्‍यावर असताना आणि डोकलाम प्रकरण विसरून विकासाकडे लक्ष द्यायचे दोन्ही देशांच्या प्रमुखांत समेट झाला असताना हे विधान करून जनरल रावत दोन्ही देशांमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप चीनच्या ग्लोबल टाइम्स या दैनिकाने केला असून, त्यांचे (जनरल रावत यांचे) तोंड खूप मोठे आहे, अशी हीन स्तरावरील टिपणी या दैनिकाच्या संपादकीय लेखात केली आहे.

ग्लोबल टाइम्सला जनरल रावत यांच्या विधानाकडे इतके गांभीर्याने घ्यावसे वाटणे, यातच दाल में कुछ काला है! जनरल रावत यांनी चीनची पाठीत सुरा खुपसण्याची वृत्ती उघड केली म्हणून ग्लोबल टाइम्सचा थयथयाट सुरू झाला. वर्ष 1965मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना चीनने कसे फसवले आणि भारताला अंधारात ठेवून हल्ला केला, तो इतिहास भारतीय विसरलेले नाहीत. जनरल रावत हे तर सैन्यदल प्रमुख आहेत. त्यामुळे चीनची विश्‍वासघातकी वृत्ती चांगलीच जाणून आहेत. डोकलामवरून सैन्य मागे घेतले. त्यामुळे आता काही चिंता नाही, सर्वकाही आलबेल झाले, अशा भ्रमात भारतीयांनी राहू नये, 1962मध्ये पंडित नेहरू यांना शेवटपर्यंत चीन शत्रू वाटतच नव्हता, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांचा त्याचा साक्षात्कार झाला. याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून रावत यांनी सूचनावजाचा इशारा दिला आहे.

ग्लोबल टाइम्स हे दैनिक चीनमधील सत्ताधारी पक्षाचे दैनिक म्हणून ओळखले जाते. भारताला सीमेवर त्रास देणारे दोनच शत्रू आहेत, चीन आणि पाकिस्तान! स्वतःच्या देशातील राज्यकर्त्यांना आणि जनतेला शत्रूपासून सावध राहणे आवश्यक आहे, असे सुचवणे यात काही गैर नाही. त्यामुळे कुठल्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन कशाला व्हायला हवे? पण चीनला तसे वाटते. जरा कुठे खुट्ट झाले की, थयथयाट करायचा, मोठा कांगावा करायचा, हे चीनचे नेहमीचेच झाले आहे. जरा काही विरोधात बोलले की, चीन हमरीतुमरीवर येतो, कारण त्यांची असहिष्णु वृत्ती! याचप्रमाणे चीनच्या साम्यवादी ग्लोबल टाइम्सने जनरल रावत यांनी आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवल्याचा कांगावा करण्यासमवेतच ते दिल्ली आणि बीजिंग येथील वातावरण शत्रुत्वाचे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला. सैन्यदल प्रमुखांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. भारताच्या सैन्यदलप्रमुखांनी शत्रूराष्ट्रांपासून देशातील नागरिकांना सतर्क करायचे नाही, तर मग कोणी करायचे? त्यांनी संभाव्य युद्धाविषयी नागरिकांची मानसिक सिद्धता करायची नाही का? मग काय डोक्यामागे हात घेऊन बिनधास्तपणे चीनसारखे धोकेबाज युद्ध करणार नाही, असा आंधळा विश्‍वास ठेवायचा? आतापर्यंत भारताकडून तसे झाले असेलही, पण यापुढे तसे होणार नाही, हाच संदेश जनरल रावत यांच्या विधानातून चीनला जातो.

त्यामुळे चीनने नसती आगळीक करण्याचा प्रयत्न करू नये. डोकलाममधील तणावाच्या वेळी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनमध्ये गेले होते. त्या वेळी नेमके काय झाले ठाऊक नाही; पण त्यानंतरच्या घडामोडीत दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. त्यामुळे डोवाल यांनी चीनला कडक शब्दांत सुनावले असणार हे नक्की! डोकलाम प्रकरणावरून माघार घ्यावी लागल्यामुळे चीनचा अहंकार बराच दुखावला आहे. भारताची ठाम भूमिका त्याला पचनी पडलेली नाही. भारताने त्याच्यासमोर झुकावे असे त्याला वाटत होते. सैन्यदलप्रमुख रावत यांनी या कार्यक्रमात चीनच्या सलामी स्लायसिंग या वृत्तीविषयी सांगितले.

भारताच्या हद्दीत सैनिकांना घुसवायचे, वाद निर्माण करायचा आणि भारताच्या सैन्य सामर्थ्याची, सैनिकांच्या प्रतिकाराची चाचपणी करायची. हळूच घुसखोरी करून आपल्याला प्रतिकार होतो का, हे चाचपून पाहायचे. सीमेवरील लोकांत फूट पाडायची आणि आपले वर्चस्व स्थापित करायचे. असे करत सीमेवरील भूभाग गिळंकृत करायचा, याला सलामी स्लायसिंग म्हणतात. चीनचा हा डाव यावेळी पूर्णतः उधळला गेला. सलामी स्लायसिंगद्वारे चीनला हिमालयाचा भाग त्याच्या ताब्यात घ्यायचा आहे. यासाठी भविष्यात चीन पुन्हा डोकलामसारखी आगळीक करणारच हे विसरून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एव्हाना परराष्ट्र राजकारण चांगलेच जमू लागले आहे. डोकलाममध्ये चीनची केेलेली मुस्कटदाबी, पाकिस्तानला एकाकी पाडणे या त्यांच्या कर्तृत्वांच्या गोष्टी आहेत, पण चीन हे वेगळे रसायन आहे अधिक काळ हिंदी-चिनी भाईभाईचे नाते राहणार नाही, हे मनी ओळखून पंतप्रधानांनी वाटचाल सुरू ठेवावी.

चीनचा मूळ स्वभाव हा साम्राजवादाचा असून, भवती असलेल्या छोट्या-छोट्या देशांचे भूभाग गिळंकृत करून आपल्या देशाचे क्षेत्रफळ वाढवण्याचा चीनचा अट्टाहास असतो. त्याचाच फटका यापूर्वी भारताला बसला आहे. भारताने 1962 च्या युद्धाचा अनुभव लक्षात घेऊन सीमेवरील इंच इंच जागेविषयी सतर्क राहणे अनिवार्य आहे. सीमेवरील सैन्यांना याबाबतचे पूर्ण कल्पना असल्यामुळे डोकलाममध्ये भारतीय सैन्यानी घुसखोरी करणार्‍या चिनी सैनीकांना वेळोवेळी रोखले. लष्करामध्ये चिनी सैनिकांबद्दल सतर्कता आहे. यात कसलाही संशय नसावा. परंतु, राजकीय पातळीवर चीन सोबतचे धोरण ठरवताना यात विसंगती असता कामा नये. सैन्य दल आणि राज्य व्यवस्था यांच्यात समन्वय असणे, ही भारताची चीनविरोधातील विलक्षण ताकद आहे.