चीनी बनावटी वस्तुंवर बहिष्कारासाठी गरज

0

निंभोरा । भारताच्या जिवावर स्वतःची आर्थिक बाजू सक्षम करुन भारताविरुध्द अप्रत्यक्षरित्या युध्दाच्या वल्गना करणार्‍या चीनला आपणच पोसत आहोत. भारतात घुसखोरी करणार्‍या चीनला आर्थिक धडा शिकविण्याची गरज असून त्यासाठी सर्व भारतीयांनी एकमताने चीनी बनावटी वस्तुंवर बहिष्कार घालावा, असे आवाहन मनसेचे रावेर तालुकाध्यक्ष स्वप्निल चौधरी यांनी केले असून यासंदर्भात चौधरी यांनी जनजागृती मोहिम सुरु केली आहे. तालुक्यात व्यापार्‍यांना भेटून ते चीनी वस्तू विक्री न करण्याचे आवाहन करीत आहे.

व्यापार्‍यांची भेट घेऊन केले आवाहन
याबाबत स्वप्निल चौधरी यांनी प्रसिध्दीपत्र काढले असून त्यांनी सांगितले की, चीनने पाकिस्तानशी मित्रत्व करुन भारताविरुध्द कारवाया करण्यासाठी नेहमीच पाकिस्तानला सहाय्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांनी चीनच्या वस्तुंवर पूर्णपणे बहिष्कार टाकून आपला पैसा चीनमध्ये जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. चीनचे सैनिक वारंवार भारताच्या भुमीवर घुसखोरी करतात. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हा खुप मोठा धोका आहे. भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शिरकाव करुन स्वदेशीला नेस्तनाभूत करण्याचा पायंडा पत्कारलेल्या चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याची गरज आहे. मात्र भारतात चीन खेळणे आणि वस्तुंचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे की, देशताील लघु उद्योग बंद पडत चालले आहेत. अनेक भारतीय कारागिर बेरोजगार असल्याची खंत चौधरी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय लघु उद्योगांना ‘मेड इन चायना’ वस्तुंशी दोन हात करावे लागत आहेत. त्यामुळेच आपण भारतीय वस्तुंचा वापर वाढवणे गरजेचे आहे. येत्या काळात रक्षाबंधन, नागपंचमी, दहिहंडी, गणेशोत्सव आदी सण येणार आहे. या सण उत्सवाला चिनी वस्तू खरेदी न करता स्वदेशी वस्तू घ्याव्यात. आपला पैसा आपल्याच देशात गुंतवणूक एकप्रकारे देशसेवेत हातभार लावणे गरजेचे आहे, असे आवाहन रावेर तालुकाध्यक्ष स्वप्निल चौधरी यांनी व्यक्त केले आहे.