नवी दिल्ली । चीन-पाकिस्तानसह देशातंर्गत शत्रुंसह लढण्यास भारतीय लष्कर तयार असल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले आहे. पाकिस्तानातील सोशल मीडिया काश्मीरमधील युवकांना भडकवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
40 वर्षांत एकही गोळी झाडली गेली नाही
भारतीय लष्कराची तयारी कोणत्याही एका देशाविरोधात नसल्याचेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. भारत हा विविध आघाड्यांवर लढाई करण्यास सक्षम असला तरी युद्ध टाळण्यासाठी विविध उपाययोजनाही करणे आवश्यक असल्याचे मत जनरल रावत यांनी यावेळी व्यक्त केले. भारत-चीन सीमारेषेवर गेल्या 40 वर्षांत एकही गोळी झाडली गेली नसल्याचे पंतप्रधानांनीही सांगितल्याचे जनरल रावत यांनी नमूद केले.
काश्मिरस्थिती लवकरच सुधारेल
रावत म्हणाले, आम्ही अतिशय वेगवान पध्दतीने लष्कराचे अत्याधुनिकरण करत आहोत. आपल्याकडे असणारी 30 टक्के हत्यारे ही जुनी आहेत. कमी वापर होणारी हत्यारे 40 टक्के आहेत. अत्याधुनिक उपकरणे ही 30 टक्के आहेत. काश्मीरमधील स्थितीवर रावत म्हणाले की, काश्मीरमधील स्थिती लवकरच सुधारेल. पाकिस्तानमधील सोशल मीडियाच काश्मीरातील युवकांना भडकवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
लष्कर ‘डर्टी वॉर’चा सामना करत आहे
4 जून रोजी रावत म्हणाले होते की, काश्मीरमध्ये आपले लष्कर ‘डर्टी वॉर’चा सामना करत आहे. तिथे लढण्यासाठी ‘इनोव्हेटिव्ह’ पध्दतीचा वापर करण्याची गरज आहे. रावत यांनी मेजर लीतुल गोगोई यांनी वापरलेल्या ह्यूमन शील्ड पध्दतीची पाठराखण केली होती. श्रीनगरमध्ये गोगोई यांनी दगडफेक करणार्यामधुन वाहन नेण्यासाठी ह्यूमन शील्डचा वापर केला होता. त्यांनी एका काश्मीरी व्यक्तीला बचावासाठी जीपला वापरले होते.