चुंचाळेत तरुणाची आत्महत्या

तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट : यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

यावल : तालुक्यातील चुंचाळे गावातील 30 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चुंचाळे गावातील रहिवासी असलम सायबु तडवी (30) याने शुक्रवारी सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. तडवी यांचा मुलगा आशु (6) हा घरात आपल्या वडीलांना पाहण्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. असलम यांना तत्काळ खाली उतरवून उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना रस्त्यातच तरुणाची प्राणज्योत मावळली. मयत तरुण असलम तडवी हा मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत होता. मयत तरुणाच्या मृतदेहावर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले..