चुंचाळे-नायगाव रस्त्यावर सव्वा लाखांची रोकड लांबवली

0

पोलिसांना संशयीतांचे मिळाले वर्णन ; लवकरच लागणार गुन्ह्याचा छडा

यावल- तालुक्यातील चुंचाळे-नायगाव रस्त्यावर दुचाकीवर जाणार्‍या एकास दोघांनी अडवून तब्बल सव्वा लाखांची रोकड लांबवल्याची घटना गुरूवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी तक्रारदाराने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी संशयीतांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी म्हणाले.

धाक दाखवत लांबवली रक्कम
शिवाजी निंबाजी गवळी (रा.मोघण, ता.जि.धुळे) हे भारत फायनान्स मध्ये कार्यरत आहेत. बचत गटांना पुरवलेल्या अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्याचे काम ते करतात. गुरूवारी ते नियमित कामाकरीता सावखेडासीम, नायगाव व चुंचाळे या भागात दुचाकी (एम.एच. 18 – 7145) व्दारे फिरत होते. त्यांनी बचत गटांकडून एक लाख 27 हजार 304 रुपयांची रक्कम जमा केल्यानंतर ते दुपारी दिड वाजेच्या सुमारास दुचाकीवरून चुंचाळेहून नायगाव कडे जात होते. दोन्ही गावाच्या मध्यभागी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना लाकडी दांड्यांचा धाक दाखवून अडवले व त्यांच्या जवळील रोख रक्कम तसेच 11 हजार रुपये किंमतीच्या टॅबलेट फोन हिसकावून पळ काढला. यावल पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी, उपनिरीक्षक अशोक आहिरे पथकासह दाखल झाले व परीसराची व घटनास्थळाची पाहणी केली. या बाबत दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक आहिरे, हवालदार संजय तायडे करीत आहेत.