चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत बक्षिसांच्या रकमेची खैरात!

0

दुबई । आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील विजेत्या संघाला देण्यात येणार्‍या रकमेमध्ये यावेळी वाढ झाली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 2.2 दशलक्ष डॉलर्सची म्हणजे तब्बल 14 करोड रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आयसीसीने बक्षिसाच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. आयसीसी आगामी स्पर्धेसाठी सहभागी संघांवर बक्षिसाच्या रुपात तब्बल 45 लाख डॉलर्स इतकी रक्कम मोजणार आहे. आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते. सदर स्पर्धा इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणार आहे.

50 षटकांच्या सामन्यांची ही वनडे स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. जगातील अव्वल आठ संघांचा यामध्ये समावेश राहील. 2013 साली झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला मिळालेल्या बक्षीस रकमेमध्ये यावेळी पाच लाख डॉलर्सची वाढ करण्यात आली आहे. आता या स्पर्धेसाठी एकूण बक्षीसांची रक्कम 4.5 दशलक्ष डॉलर्स असून विजेत्याला 2.2 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धा 1 ते 18 जून दरम्यान होणार आहे. उपविजेत्या संघाला 1.1 दशलक्ष डॉलर्स तर उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱया इतर दोन संघांना प्रत्येकी 450,000 डॉलर्सची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक गटात तिसऱया स्थानावर असलेल्या संघाला 90 हजार डॉलर्स मिळतील. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील शेवटच्या संघाला प्रत्येकी 60 हजार डॉलर्स बक्षीस दिले जाईल. आयसीच्या आठव्यांदा रंगणार्‍या स्पर्धेत यंदा क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले असून दोन गटात संघाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. गतविजेता भारतीय संघ ‘ब’ गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल.