चॅम्पियन्स ट्रॉफीवर गदाच?

0

नवी दिल्ली । चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या सहभागाचा निर्णय घेताना प्रशासकीय समितीची मंजुरी बंधनकारक असेल, असे निर्देश समितीचे प्रमुख विनोद राय यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्‍यांना दिले आहेत. आता बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा 7 मे रोजी होणार आहे, या सभेत स्पर्धेत सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय कळू शकतो. मात्र आजवरच्या घडमोठी पाहिल्यानंतर या महत्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाची शक्यता धूसर होऊ लागली आहे. आयसीसीमधील अर्थकारण आणि प्रशासन या संदर्भातील नव्या आराखडयाच्या मुद्दयावर प्रतिस्पर्ध्यांनी बीसीसीआयचा मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे बीसीसीआयने अडवणुकीचे धोरण स्वीकारीत चॅम्पियन्स करंडकासाठीचा भारतीय संघ जाहीर करण्यात दिरंगाई करीत आहे.

निर्णय भारतासाठीच घातक
विनोद राय म्हणाले की, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घ्यायचाच असेल, तर तो विशेष सर्वसाधारण सभेतील सर्व सदस्यांचा (30) तो एकमताने निर्णय असायला हवा. शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील आयसीसीवर कायदेशीर कारवाई करण्याचे धोरण काही बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांनी आखले आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यावरही आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडून याविषयीचे मत घेऊ. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत न खेळण्यासारखा निर्णय घेणे भारतासाठी योग्य ठरणार नाही. या स्पर्धेतून भारताने माघार घेतल्यास आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पुढील आठ वर्ष त्यांना खेळता येणार नाही. त्यामुळे हा निर्णय काही सदस्यांनी घेता कामा नये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अर्थकारण आणि प्रशासन या संदर्भातील नव्या आराखड्याच्या मुद्दयावरुन आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र दुसरीकडे एवढा मोठा निर्णय बीसीसीआय घेणार नाही असा आशावाद क्रिकेट अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

पदाधिकार्‍यांना दिल्या सूचना
आयसीसीच्या महसूल आराखडयासंदर्भातील कोणताही निर्णय हा विशेष सर्वसाधारण सभेत घेतला जाईल, अशा प्रकारचे निर्देश आम्ही दिले आहेत. चॅम्पियन्स करंडकातील सहभागासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये, असे पदाधिकार्‍यांना कळवण्यात आले आहे, असे राय यांनी सांगितले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपल्या दहा विश्वासू प्रशासकांसह चॅम्पियन्स करंडकातून माघार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) नोटीस पाठवण्यासंदर्भात चर्चा केल्याचे प्रशासकीय समितीला असे निदर्शनास आले आहे. बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा 7 मे रोजी होणार आहे. या सभेत संघनिवडी आणि सहभागावर चर्चा न झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीत गतविजेती टीम इंडिया दिसण्याची चिन्हे कमीच आहेत.